सरकारविरोधात हल्लाबोल, भाजपा सरकार फेकू असल्याची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 04:11 AM2017-11-27T04:11:10+5:302017-11-27T04:11:40+5:30
भाजपा सरकार जनेतेचे प्रश्न सोडविण्यास अपयशी ठरले आहे. केवळ आश्वासने दिली, पूर्तता केली नाही. त्यामुळे भाजपा सरकार हे फेकू आणि फसवे सरकार असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
पिंपरी : भाजपा सरकार जनेतेचे प्रश्न सोडविण्यास अपयशी ठरले आहे. केवळ आश्वासने दिली, पूर्तता केली नाही. त्यामुळे भाजपा सरकार हे फेकू आणि फसवे सरकार असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आकुर्डी गावठाण ते प्राधिकरण तहसील कार्यालयापर्यंत ‘हल्लाबोल’ आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या समारोपावेळी घेण्यात आलेल्या सभेत माजी उपमुख्यमंत्री पवार यांनी हल्लाबोल आंदोलनामागील भूमिका विशद केली.
ते म्हणाले, की सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे अशी हल्लाबोल आंदोलने राज्यात सर्वत्र होणार आहेत. २९ नोव्हेंबरला पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन होईल. १ ते १२ डिसेंबर या कालावधीत यवतमाळ ते नागपूर असे आंदोलन करण्यात येणार आहे.
ज्या पिंपरी-चिंचवडला स्वच्छतेचा मान मिळवून दिला, त्या शहरात कचºयाचे ढीग दिसून येतात. अनधिकृत बांधकामे नियमित करू, शास्ती माफ करू ही त्यांची आश्वासने हवेत विरली आहेत.
भाजपा सरकार अपयशी पडू लागल्याचे निवेदन अजित पवार यांनी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे यांच्याबरोबर जाऊन अप्पर तहसीलदार संजय भोसले यांना दिले.
महापालिकेत, राज्यात, देशात त्यांची सत्ता असताना प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे रस्त्यावर उतरावे लागते. सांगली प्रकरणात एका निष्पाप तरुणाला केवळ संशयावरुन पकडून पोलिसांनी जिवंत मारले. एवढेच नव्हे, तर मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. भाजपा सरकारच्या काळात माणसे जिवंत जाळली जात आहेत, ही शोकांतिका आहे. भाजपा नेत्यांना बोलताना तारतम्य नसल्याचे पवार यांनी नमूद केले. पालकमंत्रीच सभेत दारूला महिलेचे नाव द्या, जास्त विक्री होईल असा सल्ला देतात. राज्याचे प्रमुख दस्तुरखुद्द मुख्यमंत्री भर सभेत नाभिक समाजाबद्दल अनुद्गार काढतात. सहकार मंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात, रस्त्यावर खड्डे पडले म्हणून काय आभाळ फाटलं का?