मारुंजीत शॉर्टसर्किटमुळे फळबाग भस्मसात; शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 04:56 PM2018-02-13T16:56:33+5:302018-02-13T18:25:16+5:30
मारुंजी (मुळशी) येथे महावितरणच्या २२ के व्ही उच्चदाब विजवाहिनीच्या शॉर्टसर्किटमुळं लागलेल्या आगीत फळबाग भस्मसात झाल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड (वाकड) : मारुंजी (मुळशी) येथे महावितरणच्या २२ के व्ही उच्चदाब विजवाहिनीच्या शॉर्टसर्किटमुळं लागलेल्या आगीत फळबाग भस्मसात झाल्या आहेत. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप एका शेतकऱ्याने केला असून महावितरणने मात्र, याबाबत हात झटकले आहेत.
अंकुश जगताप असे शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्या बागेत आंबा, अंजीर, स्टार फ्रूट (कमळ कैरी) व कागदी लिंबू अशी ४०हून अधिक फळ धारणेसाठी तयार असलेली, मोहरलेली झाडे जळाली आहेत. पहाटे ही बाब जगताप यांच्या निदर्शनास आली. चौकशी करता आजूबाजूलाही अनेक शेतकऱ्यांच्या शेतात शॉर्टसर्किटमुळं आग लागल्याचे समजले. जगताप यांनी खडकाळ जमिनीत साडेतीन वर्षांपूर्वी लावलेल्या झाडांना फळधारणा सुरु झाली होती. आंबा दोन वर्षांपासून मोहोरला आहे. अंजीर बाग लावली आहे. अशातच लागलेल्या या आगीत ३ ते ४ लाखाहून जास्त नुकसान झाल्याने जगताप हवालदिल झाले आहेत.
हिंजवडी येथील टाटा प्लास्टिक, टाटा जॉन्सन या कंपन्यांनी १९९५ साली टाकेलेली खासगी विजवाहिनी आहे. तेव्हा एमआयडीसी देखील नव्हती. पण जगताप यांनी सहकार्य करून ही विजवाहिनी स्वत:च्या शेतातून होऊ दिली. यानंतर जुन्या तारा बदलल्याच नाहीत. त्यातून शॉर्टसर्किटमुळे ठिणग्या पडून गेल्या ३ वर्षात परिसरात आगीच्या १० घटना घडल्या. जगताप यांचे मागील वर्षीही १० झाडे जळून असे नुकसान झाले होते. मात्र, उडालेले चिनी मातीचे कंडक्टर बदलून जुजबी दुरुस्ती केली जाते. पण आता आगीमुळे झाडंच होरपळल्याने मोठे नुकसान सहण करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यामुळं नुकसानीचा पंचनामा करून भरपाई द्यावी अशी मागणी अंकुश जगताप यांनी केली आहे. माहिती देऊनही महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी आलेच नाहीत. हिंजवडी विभागाचे अधिकारी कुलकर्णी प्रतिसाद देत नसल्यानं वेळ पडल्यास महावितरण विरोधात दावा दाखल करणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले आहे. मात्र अद्याप या ठिकाणी महावितरणचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी फिरकला नाही या आगीत बाळासाहेब भीमराव बुचडे यांच्या शेतातील लाकडं, ओंडके आणि राजू निवृत्ती बुचडे यांच्या घराजवळील कुरणातील चारा जळून नुकसान झाले आहे.
आग विजवाहिनीमुळे नाही
याबाबत हिंजवडी विभागाचे सहाय्यक अभियंते डी. व्ही कुलकर्णी यांना विचारणा केली असता ते म्हणाले, हा प्रकार आमच्या विजवाहिनीमुळे होऊच शकत नाही. येथील विज वहिनी ४० वर्षांपूर्वी टाटाने टाकलेली मजबूत उच्च क्षमतेची असल्याने यातून शॉर्टसर्किट होऊ शकत नाही.
या ठिकाणी वारंवार विजगळती होत असते. याबाबत लोक तक्रारी करतात. शॉर्टसर्किट होत असल्याचा व्हिडीओ ही माझ्याकडे आहे मात्र याची तक्रार करताच तात्पुरती दुरुस्ती होते. पण जुन्या तारांमुळे ही समस्या कायम आहे. मागील वर्षीच आमची १० झाडे व विद्युत साहित्य जळून नुकसान झाले होते आणि आताही तोच प्रकार घडला. त्यामुळे महावितरणने रीतसर पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी.
- अंकुश जगताप, शेतकरी