सोने, वाहन खरेदीसाठी गर्दी
By admin | Published: October 12, 2016 02:10 AM2016-10-12T02:10:18+5:302016-10-12T02:10:18+5:30
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या गेलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर नागरिकांनी वाहन व सोने खरेदीसाठी गर्दी केली होती. मुहूर्तावर वाहन विक्रीस मोठा प्रतिसाद
पिंपरी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या गेलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर नागरिकांनी वाहन व सोने खरेदीसाठी गर्दी केली होती. मुहूर्तावर वाहन विक्रीस मोठा प्रतिसाद दिसून आला. सोमवारच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी मंगळवारी प्रतिग्रॅम ८
रुपयांनी सोन्याचा दर वाढला असतानाही सराफी पेढ्यांमध्ये मुहूर्ताच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली.
सोमवारी २२ कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅमचा (एक तोळे) दर ३२ हजार ८१८ होता. तो दर प्रतितोळा दुसऱ्या दिवशी मंगळवारी ३२ हजार ९१० इतका झाला. एक तोळ्यासाठी ९२ रुपये जादा मोजण्याची तयारी ठेवून ग्राहकांनी मुहूर्तावरील खरेदीला प्राधान्य दिले. चिंचवडगाव, पिंपरी, निगडी, सांगवी,भोसरी येथील सराफी पेढ्यांमध्ये ग्राहकांची रात्रीपर्यंत गर्दी दिसून आली.
उद्योगनगरीत मुहूर्तावर वाहन खरेदीलाही महत्त्व देण्यात आले. अनेकांनी अगोदर एक ते दोन महिने वाहनांचे बुकिंग केले होते. वाहन मात्र दसऱ्याच्या मुहूर्तावर नेण्यास प्राधान्य दिले. शोरूमध्ये सकाळपासून वाहने नेण्यासाठी ग्राहक दाखल झाले होते. अनेकांनी शोरूमध्येच कुटुंबासह येऊन पूजा करून वाहन नेले. (प्रतिनिधी)