नवरात्रौत्सवानिमित्त खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी
By admin | Published: October 13, 2015 12:58 AM2015-10-13T00:58:24+5:302015-10-13T00:58:24+5:30
नवरात्रौत्सव म्हणजे महिलांसाठी आनंदाचा सण असतो. यामुळेच भक्तिभावाने पूजाअर्चा करण्यासाठी महिलांची खरेदीसाठी बाजारात रेलचेल दिसून येत आहे.
पिंपरी : नवरात्रौत्सव म्हणजे महिलांसाठी आनंदाचा सण असतो. यामुळेच भक्तिभावाने पूजाअर्चा करण्यासाठी महिलांची खरेदीसाठी बाजारात रेलचेल दिसून येत आहे. पिंपरी कँम्पमध्ये नवरात्रीसाठी देवीचे घट खरेदीसाठी महिलांची गर्दी झाली होती.
देवीच्या घटासाठी विधिवत पूजेसाठी लागणारे खण-साडी, बांगडीओटी, तसेच घटाच्या पूजेसाठी पत्रावळीही बाजारात विक्रीसाठी दाखल झाली आहे. यामध्ये लहान मोठी अशा दोन प्रकारची पत्रावळी आहे. तसेच पाच फळे यामध्ये कौट, कवंडा, सीताफळ, बेलफूल, पेरू याचा समावेश आहे.
देवीसाठी लागणारा लाल घट ५० रुपयाला आहे, तर काळा घट ३० रुपयांपर्यंत आहे. त्यासाठी लागणारी परडी ३० रुपयाला आहे . पूजेसाठी लागणारे लाल कापड ५० रुपयाला आहे. तसेच हळद, कुंकू , कापूर, अगरबत्ती, गुलाल, धूपकांडी ही बाजारात उपलब्ध आहे.
मंदिरामध्ये देवीपुढे दिवा लावण्यासाठी अखंड वात आहे. यामध्ये लांबवात, वस्त्रमाळ, फुलवात ही उपलब्ध आहे. या वाती १० रुपयाला आहेत.
नारळ १५ ते २० रुपयाला आहे. मोठी परडी १०० ते १५० रुपयाला आहे, तर मंडपी ३० रुपयाला आहे. देवीचे शृंगार पाकीट ३० ते ७० रुपये, तसेच देवीच्या पूजेसाठी लागणारी लोभाणदाणी, ऊददाणीही बाजारात आल्या आहेत. एक घट बसविण्यासाठी घटासाठी लागणारी काळी माती १० रुपयाला आहे.
(प्रतिनिधी)