खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी, दस-याचा मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 04:58 AM2017-09-25T04:58:58+5:302017-09-25T04:59:20+5:30
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमीच्या (दसरा) मुहूर्तावर खरेदीला महत्त्व असल्याने ग्राहकांनी गृहप्रकल्पांमध्ये सदनिकांचे बुकिंग केले आहे.
पिंपरी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमीच्या (दसरा) मुहूर्तावर खरेदीला महत्त्व असल्याने ग्राहकांनी गृहप्रकल्पांमध्ये सदनिकांचे बुकिंग केले आहे. वाहन खरेदीस इच्छुक असणा-यांनी दुचाकी, चारचाकी वाहनांचे बुकिंग करून ठेवले आहे. दस-याच्या दिवशी ते नवीन वाहन घरी आणण्याचे त्यांचे नियोजन आहे. गृहप्रवेशासाठीही अनेकांनी हा मुहूर्त साधण्याचा प्रयत्न केला आहे. जीएसटी लागू झाल्यानंतरही बाजारपेठेत तेजी आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात विविध भागाातील दुचाकींच्या दालनात अनेकांनी वाहनांचे बुकिंग केले आहे. डाऊन पेमेंट अदा केले आहे. बँकेची कर्ज प्रक्रिया पूर्ण करून सुमारे तीन हजार वाहने आरटीओकडे नोंदणीसाठी आली आहेत. काहींनी आवडता क्रमांक मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दसºयाच्या अगोदर आरटीओ कार्यालयात वाहनाची नोंदणी होण्यासाठी काहींची
धावपळ सुरू आहे. वाहनविक्रीच्या दालनात ग्राहकांची गर्दी दिसून येऊ लागली आहे, तर त्यांना विविध वित्तसंस्थांचे कर्ज उपलब्ध करून देणे, आरटीओ कार्यालयाकडे नोंदणीसाठी कागदपत्रे पाठविणे, वाहनाचा विमा भरून घेणे आदी कामांसाठी प्रतिनिधींची लगबग सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. चारचाकी वाहन खरेदी करणाºया ग्राहकांचीही धावपळ दिसून येत आहे. ग्रुप बुकिंगवर सवलत असल्याने एकत्रितपणे एकाच वेळी दुचाकी खरेदी करणाºयांचे प्रमाण वाढले आहे.