Crypto Fraud | पिंपरी-चिंचवडमध्ये क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 02:53 PM2023-02-18T14:53:48+5:302023-02-18T14:58:39+5:30
आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला...
पिंपरी : क्रिप्टो करन्सीच्या नावाने नफा मिळवून देण्याच्या आमिषाने एकाच्या खात्यातून तब्बल १४ लाख ४८ हजार ९०० रुपये काढून घेण्यात आले. ही घटना बुधवारी (दि. १५) सायंकाळी सव्वाचार ते रात्री साडेनऊच्या दरम्यान घडली. याप्रकरणी अभिषेक कमलकुमार माथूर (वय ४३, रा. मारुंजी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि. १६) फिर्याद दिली. त्यानुसार फिर्यादीला संपर्क साधणाऱ्या मोबाइलधारकासह आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एका व्हॉट्सॲप क्रमांकावर अनोळखी क्रमांकावरून मेसेज आला. त्याद्वारे टेलिग्राम ग्रुपमध्ये फिर्यादी यांना ॲड केले. तसेच फिर्यादी यांना नफा मिळवून देण्याच्या आमिषाने एका वेबसाइटवर क्रिप्टो अकाउंट ओपन करण्यास सांगितले. या अकाउंटवर फिर्यादी यांना पैसे भरण्यास सांगितले. फिर्यादी यांनी त्यावर १४ लाख ४८ हजार ९०० रुपये भरले. ही रक्कम क्रिप्टो अकाउंटवर तब्बल २८ लाख ८० हजार दिसत होती. फिर्यादी यांनी या अकाउंटवरून पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता पैसे निघाले नाहीत. त्यामुळे फिर्यादी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. फिर्यादीचे पैसे त्यांना संपर्क साधणाऱ्या मोबाइलधारकासह बँकेचे अकाउंट असणाऱ्या मनीष कोंडल, तसेच आणखी वेगवेगळे अकाउंट असणाऱ्या पाच जणांनी फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.
क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?
क्रिप्टो-चलन किंवा क्रिप्टो हे एक डिजिटल चलन आहे. जे संगणक नेटवर्कद्वारे व्यवहाराचे माध्यम म्हणून काम करण्यासाठी तयार केलेले आहे. हे चलन टिकवून ठेवण्यासाठी किंवा राखण्यासाठी सरकार किंवा बँकेसारख्या कोणत्याही केंद्रीय प्राधिकरणावर अवलंबून नाही.