रब्बी हंगामातील लागवडींना वेग
By admin | Published: October 5, 2016 01:19 AM2016-10-05T01:19:40+5:302016-10-05T01:19:40+5:30
खेडसह शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या वरुणराजाने आज सकाळपासून उघडीप दिल्याने बळीराजा रब्बी हंगामाच्या तयारीला लागला आहे.
शेलपिंपळगाव : खेडसह शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या वरुणराजाने आज सकाळपासून उघडीप दिल्याने बळीराजा रब्बी हंगामाच्या तयारीला लागला आहे.
परतीच्या मुसळधार पावसाने परिसरातील जलस्रोत खळखळू लागले आहेत. त्यामुळे विहिरींमधील पाणीपातळीतही वाढ झाली आहे. मुबलक पाणी उपलब्ध होत असल्याने शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण पसरले असून, रब्बी हंगामातील कांदालागवडींच्या कामांना त्याचा अधिक फायदा होत आहे.
परिसरात काही ठिकाणी ज्वारी पिकाची पेरणीची कामे मार्गी लागली आहेत, तर काही ठिकाणी जमिनींचा वापसा पाहून पेरणी केली जात आहे.
पावसाने उघडीप दिल्याने कांदालागवडीच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे. चालू
वर्षी पावसाळी हंगामाच्या सुरुवातीच्या दिवसात वरुणराजाने ओढ दिल्याने खरिपाच्या पेरण्या धोक्यात आल्या होत्या. परंतु, दोन महिन्यांच्या प्रदीर्घ ओढीनंतर वरुणराजाची चांगल्या प्रमाणात कृपा झाल्याने पाण्याची चिंता दूर होण्यास मदत झाली.
उशिरा का होईना झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी खरिपातील महत्त्वाच्या पिकांच्या पेरणीला पसंती देऊन पेरणीची कामे उरकवून घेत आहेत.
अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी काही परिसरात बिनपेरणीच्याच अवस्थेत होत्या. सध्या रब्बी हंगामाचा कालखंड सुरु झाल्याने बळीराजाने या हंगामातील पिकांच्या पेरणीला बैलांच्या साह्याने सुरुवात केली आहे.
(वार्ताहर)