चालक व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रिक्षामंध्ये पडदा; कोरोनामुळे संसर्ग रोखण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 05:23 PM2020-06-01T17:23:05+5:302020-06-01T17:27:06+5:30
नॉन रेडझोनमध्ये काही अटीशर्तीच्या आधारावर रिक्षा चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे
पिंपरी : कोरोनामुळे पिंपरी - चिंचवड शहरातील रिक्षा व्यवसाय तीन महिन्यांपासून बंद आहे. नॉन रेडझोनमध्ये काही अटीशर्तीच्या आधारावर रिक्षा चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु रिक्षाचालक आणि प्रवासी यांची सुरक्षा राखली जावी यासाठी रिक्षात पारदर्शक पडदा लावण्यात येणार आहे. रिक्षात सॅनिटाईझर आणि इतर सुरक्षा साधने बाळगण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.
शहरातील रिक्षाचालक व प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उपाययोजनांबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी व रिक्षाचालक यांच्यात चर्चा झाली. यावेळी रिक्षात पारदर्शक पडदा लावण्याबाबत निर्णय घेण्यात आला. सुरक्षा पडदा कसा असावा, ऊन, वारा, पाऊस तसेच सुरक्षा पडदा फाटू नये अथवा त्याचे नुकसान होऊ नये म्हणून वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक (नियोजन) प्रसाद गोकुळे यांच्याकडून रिक्षांना वेगवेगळ्या स्वरूपात सुरक्षा पडदे लावून पाहणी करण्यात आली. हा पडदा काढता येईल आणि रोज बसवता येईल. महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे आणि रिक्षा चालकांसोबत चर्चा करून याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
बाबा कांबळे म्हणाले, रिक्षा चालकांच्या अडचणी समजून घेत रिक्षातून प्रवासी वाहतुकीसाठी सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र रिक्षा चालक आणि प्रवाशी यांच्या सुरक्षेबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.