ग्राहकांना फसविणारे ‘पॉन्झी’ कार्यरत
By admin | Published: December 21, 2015 12:34 AM2015-12-21T00:34:45+5:302015-12-21T00:34:45+5:30
दामदुप्पट रक्कम मिळवून देण्याचे आमिष, कमी गुंतवणुकीवर मोठ्या रकमेचा लाभ अशा विविध योजना पुढे करून चिटफंडच्या नावाखाली कोट्यवधींची माया जमा करणारे
पिंपरी : दामदुप्पट रक्कम मिळवून देण्याचे आमिष, कमी गुंतवणुकीवर मोठ्या रकमेचा लाभ अशा विविध योजना पुढे करून चिटफंडच्या नावाखाली कोट्यवधींची माया जमा करणारे ‘पॉन्झी’ पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यरत आहेत. कमी गुंतवणुकीत जादा रक्कम मिळवून देण्याच्या चिटफंडच्या योजना सुरुवातीला सुरू करून जमा झालेली रक्कम नंतर अन्य व्यवसायांत वळवून चिटफंडशी संबंध नाही, हे भासविण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. देशभरातील ‘चिटफंड’ गैरव्यवहाराची भांडाफोड होऊ लागल्यानंतर शहरातील ‘पॉन्झी’ हादरले आहेत.
शहरात गेल्या दहा वर्षांत आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दोन महिन्यांत रक्कम दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून सनराईज कन्सल्टन्सीवाला कोट्यवधी रुपये घेऊन येथून सहीसलामत निघून गेला. दामदुप्पट रक्कम मिळेल, या आशेवर ज्यांनी पैसे गुंतवले होते, त्यांना दुप्पट पैसे तर दूरची बाब; मुद्दलही मिळू शकली नाही. या फसवणुकीच्या प्रकारानंतर अद्यापपर्यंत अशा अनेक घटना घडल्या आहेत. मूळचा इटालियन असलेल्या चार्ल्स पॉन्झीने चिटफंडच्या माध्यमातून अमेरिकेतील बोस्टन शहरात १९२० मध्ये गुंतवणुकीवर जादा रक्कम देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांच्या रकमेचा अपहार केला. गुंतवणूकदारांना त्यांच्या रकमा परत न करता ते पैसे अन्यत्र वापरले. या पॉन्झीच्या पावलावर पाऊल ठेवणारे चिटफंडवाले शहरात उदयास आले आहेत. भोसरी, संत तुकारामनगर, काळेवाडी, आकुर्डी, दापोडी, चिंचवड आणि शहरालगतच्या परिसरात त्यांनी जाळे पसरवले आहे. गुंतवणूकदारांना त्यांनी गुंतविलेल्या रकमेचा परतावा न मिळाल्यास एखाद्याने पोलिसांकडे धाव घेतली, तर शहरातील अशा चिटफंडवाल्यांचे बिंग फुटणार आहे.
गुंतवणुकीवर अवघ्या तीन महिन्यांत, सहा महिन्यांत जादा रक्कम मिळवून देतो अशा आकर्षक योजना जाहीर करून ग्राहकांना पैसे गुंतविण्यास भाग पाडायचे, त्यांच्याकडून जमा होणारा पैसा जमीन खरेदी, गृहप्रकल्प उभारणी अशा कामासाठी वापरायचा असे उद्योग केले जात आहेत. काहींनी तर प्रतिदिनी शेकडा चार ते पाच टक्के याप्रमाणे खासगी सावकारांकडे रकमा गुंतविल्या. सावकारी करणारे चोरावर मोर निघाले. त्यांनी या चिटफंडवाल्यांना लाखो रुपयांना गंडा घातला आहे.
नागरिकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने विविध योजना सुरू करणाऱ्यांनाच गंडा घातला असताना, याची वाच्यता नको म्हणून अशा प्रकरणांची फिर्याद देण्याचे धाडस चिटफंडचे संचालक दाखवत नाहीत. मात्र, ठिकठिकाणचे चिटफंड घोटाळे उघड होऊ लागल्याने शहरातील चिटफंडवाल्यांचे धाबे दणाणले आहे.(प्रतिनिधी)