सिलिंडरच्या कृत्रिम टंचाईने ग्राहक हैराण
By admin | Published: March 10, 2017 05:02 AM2017-03-10T05:02:00+5:302017-03-10T05:02:00+5:30
घरगुती गॅस सिलिंडर संपल्यानंतर आॅनलाइन बुकिंग करता येते. गॅस बुकिंग झाल्यावर दोन ते चार दिवसांत गॅस घरपोच मिळतो. मात्र, गॅस बुकिंग करूनसुद्धा
पिंपरी : घरगुती गॅस सिलिंडर संपल्यानंतर आॅनलाइन बुकिंग करता येते. गॅस बुकिंग झाल्यावर दोन ते चार दिवसांत गॅस घरपोच मिळतो. मात्र, गॅस बुकिंग करूनसुद्धा आठ ते पंधरा दिवसांनंतरही गॅस मिळत नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. प्रत्यक्षात गॅस एजन्सीकडे सिलिंडर घेऊन गेल्यास ताबडतोब गॅस मिळत असल्याने नक्की ही टंचाई कशामुळे झाली आहे, असा प्रश्न ग्राहकांना पडत आहे.
पिंपरी-चिंचवड शहर परिसरात फेब्रुवारी महिन्यापासून गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला. अशीच परिस्थिती या वेळीही निर्माण झाल्याने ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा तुटवडा नेमका कोणत्या कारणामुळे झाला आहे, की कृत्रिम टंचाई आहे याबाबत गॅस वितरण कंपनीकडून ग्राहकांना योग्य ते उत्तर मिळत नसल्याचे ग्राहकांचे वादाचे प्रकार घडत आहेत. मागील महिन्यात शिक्रापूर येथील एलपीजी गॅस कंपनीत गॅस भरण्याच्या प्रक्रियेत बिघाड निर्माण झाला होता. त्यामुळे गॅसटंचाई निर्माण झाली होती. मात्र, या वेळेला कंपनीकडून येणाऱ्या गाड्या कमी प्रमाणात असल्याने व मागणी वाढली असल्याचे एजन्सीकडून सांगण्यात येते. ही टंचाई अद्यापही कायम राहिल्याने ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशातच विनाअनुदानित सिलिंडरच्या किमतीत प्रत्येक महिन्यामध्ये चढउतार होत असल्याने ग्राहकाला बाजारभावानुसार सिलिंडर खरेदी करावा लागत आहे. गॅसची पूर्ण रक्कम दिल्यानंतर अनुदान बँकेच्या खात्यात जमा होते. पण गेल्या चार महिन्यांत सिलिंडरच्या किमतीत तब्बल २०० रुपयांची वाढ झाल्याने विनाअनुदानित सिलिंंडरचे दर ७६१ रुपयांवर गेले आहेत. या दरात उच्चवर्गीयांना सिलिंडर खरेदी करणे शक्य आहे. पण ही वाढ गरिबांच्या आवाक्याबाहेर असल्याने गरिबांवर संकट ओढवले आहे. अनुदानाची रक्कम बँकेत जमा होण्यासाठी बरेच दिवस लागतात. महागाईने आधीच होरपळलेल्या लोकांना घरगुती गॅसच्या दरवाढीने चटका दिला आहे. अशातच वेळेत गॅस येत नसल्याच्या तक्रारींमध्ये ही वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या नुकत्याच झालेल्या भरमसाट दरवाढीमुळे जनसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरचे दर ८६ रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे आता विनाअनुदानित गॅस सिलिंडर काही ठिकाणी ७३८ रुपयांपासून ७६१ रुपयांपर्यंत मिळत आहेत. (प्रतिनिधी)
सिलिंडरची वाहतूक : दुचाकीवरून
गॅस एजन्सीमध्ये येऊन सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ग्राहकांमध्ये वाढ होत आहे. अनेक वेळा भरलेला सिलिंडर दुचाकीवरून पेट्रोलच्या टाकीवर दोन्ही पायात घेऊन वाहतूक केली जात आहे. महिलावर्गाला देखील डोक्यावर गॅस घेऊन भर उन्हात गॅस एजन्सीचा रस्ता धरावा लागत आहे. घरातील गॅस संपल्याने महिलावर्गाला स्वयंपाक करण्यास अडचण निर्माण झाल्याने हाफ डे काढून गॅस मिळविण्यासाठी पुरुषवर्गाला पळावे लागत आहे. सिलिंडरची दरवाढ आणि नागरिकांची गरज ओळखून काही एजन्सीधारक ग्राहकांचा गैरफायदा उचलत आहेत. दरवाढीनंतर पुरवठा कमी असल्याचे सांगत ग्राहकांना ताटकळत ठेवले जात आहे. गॅस सिलिंडरची डिलिव्हरी दिल्यानंतर घरपोच डिलिव्हरीसह जास्त शुल्क आकारले जात आहे. याबाबत कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला असता पुढील डिलिव्हरीसाठी टाळाटाळ केली जाते.
काही ठिकाणी विनापावती ब्लॅकने सिलिंडर देण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असल्याचे अनेक ग्राहकांनी सांगितले. वेबसाइटवर आॅनलाइन तक्रार केल्यास ती थेट कंपनीपर्यंत पोहोचते. तसेच या तक्रारी सोडवणे आणि पाठपुरावा करण्यासाठी विशेष प्रतिनिधीची नियुक्ती करण्यात आलेली असते.
घरपोच सिलिंडर पोहचविणाऱ्या कर्मचाऱ्यांना गेल्या महिन्यापासून योग्य वेतन न मिळाल्याने कर्मचारी नाराज आहेत. त्यामुळे उंच इमारतीमध्ये राहणाऱ्या ग्राहकांना बिला व्यतिरिक्त दहा ते पंधरा रुपये जादा द्यावे लागत आहेत. याबाबत एजन्सीकडे विचारणा केली असता पावतीवर दिलेल्या रकमेइतकीच रक्कम देण्याचे सांगितले जाते. जादा रक्कम ग्राहकांकडून मोजल्यास त्याला आम्ही जबाबदार नसल्याचे सांगण्यात येते.
एजन्सीकडे तक्रार करण्यासाठी फोन केल्यावर तो लागत नसल्याचे ग्राहकांची चीड वाढत आहे. प्रत्यक्षात गॅस बुकिंग कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने फोनवर योग्य उत्तरे दिली जात नसल्याचे प्रत्यक्ष पाहणीत समजले. लवकर ही टंचाई दूर करून घरपोच व त्वरित गॅस सिलिंडर मिळावा, अशी मागणी होत आहे.