‘हायफाय’ जमान्यात सायकलचा प्रचाररथ
By admin | Published: January 25, 2017 02:04 AM2017-01-25T02:04:49+5:302017-01-25T02:04:49+5:30
प्रचारासाठी वेगवेगळे फंडे अवलंबिले जात असून, आता आधुनिक काळातही पुन्हा पारंपरिक पद्धतीने प्रचार करण्यावर भर दिला जात
पिंपरी : प्रचारासाठी वेगवेगळे फंडे अवलंबिले जात असून, आता आधुनिक काळातही पुन्हा पारंपरिक पद्धतीने प्रचार करण्यावर भर दिला जात आहे. सायकलला आणखी दोन चाके बसवीत त्यावरील लोखंडी फ्रेमवर इच्छुकांचे फलक लावून प्रचार केला जात असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
निवडणूक म्हटले, की प्रचार आलाच. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी इच्छुकांकडून वेगवेगळ्या युक्त्या लढविल्या जातात. भेटीगाठी घेण्यासह प्रचारपत्रके, जाहिरातफलक, रॅली, विविध कार्यक्रम राबविणे, भेटवस्तू देणे आदींमार्फत प्रचार केला जात आहे. यासह सोशल मीडियावरूनही प्रचाराचा धडाका सुरू आहे. या प्रचारासाठी इच्छुकांनी स्वतंत्र यंत्रणा उभी केली आहे. या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. कमी दिवसांत मतदारांपर्यंत कसे पोहोचता येईल, यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत.
सध्याच्या आधुनिक काळात प्रचारही हायटेक झाला आहे. काही क्षणात सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचणे शक्य होत आहे. दरम्यान, इच्छुक उमेदवारांची संख्याही अधिक आहे. विरोधकापेक्षा आपण कशाप्रकारे वेगळ्या पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचू शकतो. यासाठी वेगवेगळी शक्कल लढविली जात आहे. अशातच आता चिंचवडगावात सायकलच्या माध्यमातून प्रचार केला जात आहे. यासाठी विशिष्ट प्रकारची सायकल तयार करण्यात आली आहे. सायकलला दोन चाके असताना आणखी दोन छोटी चाके बसवून एक प्रकारची गाडीच तयार करण्यात आली आहे. यासाठी वेल्डिंग केले असून, फलक लावण्यासाठी मोठी लोखंडी फ्रेम तयार करण्यात आली आहे. त्यावर इच्छुकाचे चित्र लावून ही सायकल रिक्षा ठिकठिकाणी फिरविली जात आहे. महत्वाच्या ठिकाणी उभी करुन मतदानासाठी आवाहन केले जात आहे. आता पुन्हा सायकलीच्या माध्यमातून प्रचार करण्यावर भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे.(प्रतिनिधी)