सायकल शेअरिंग लांबणीवर, करारनाम्याअभावी स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त हुकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 01:10 AM2018-08-15T01:10:21+5:302018-08-15T01:10:33+5:30
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीअंतर्गत उद्योगनगरीत सायकल शेअरिंग योजना राबविण्याचे जाहीर केले होते. यासाठी स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त काढला होता. मात्र, सायकली पुरविणाऱ्या संस्थेशी करारनामाच होऊ न शकल्याने हा मुहूर्त हुकणार आहे.
पिंपरी - केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीअंतर्गत उद्योगनगरीत सायकल शेअरिंग योजना राबविण्याचे जाहीर केले होते. यासाठी स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त काढला होता. मात्र, सायकली पुरविणाऱ्या संस्थेशी करारनामाच होऊ न शकल्याने हा मुहूर्त हुकणार आहे.
शहराचा केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अंतर्गत समावेश झाल्यानंतर या योजनेतील संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत नागरिकांना सायकल वापरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सायकल शेअरिंग ही योजना राबविण्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जाहीर केले होते.
स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात पिंपळे सौदागर व परिसर निवडला होता. या योजनेकरिता नाममात्र दरांत सायकली उपलब्ध करून देण्याची युलू, पेडल, मोबीसाईल आणि मोबिक या चार सायकल कंपन्यांनी तयारी दर्शविली आहे. याकरिता प्रतितास नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे. मात्र, हे भाडे आॅनलाइन पद्धतीने भरावे लागणार आहे. दरम्यान, नागरिकांनी कमी अंतराच्या ठिकाणी जाण्यासाठी सायकलचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी पिंपळे सौदागरमधील बीआरटीएस मार्गालगत महापालिका प्रशासनाने सायकल उभ्या करण्यासाठी केवळ जागा उपलब्ध करून देणार आहेत. याशिवाय सोसायट्यांच्या आवारात सायकलीसाठी जागा मिळणार आहे.
शहरात ४५ ठिकाणी नियोजन
पिंपळे सौदागर व परिसरात एकूण ४५ ठिकाणी या सायकली उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. सुरुवातीला सायकलींची संख्या दोनशे होती; मात्र त्यामध्ये वाढ करून ही संख्या पाचशेपर्यंत वाढविण्यात आली आहे. एका ठिकाणी किमान पाच सायकली उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सायकली पुरविणाºया संस्थेशी करारनामाच होऊ न शकल्याने स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त हुकणार असल्याचे दिसून येत आहे.