सायकल शेअरिंग सेवा सुरू होणार, रोझलँड रेसिडेन्सीचा पुढाकार; पर्यावरण रक्षणाचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 01:39 AM2017-11-25T01:39:04+5:302017-11-25T01:39:20+5:30
रहाटणी : सध्याच्या धावपळीच्या युगात आरोग्याकडे लक्ष देण्यास अनेकांना वेळच नसतो. त्याचबरोबर सध्या प्रत्येक व्यक्तीस एक वाहन ही संकल्पना माणसाच्या मनात रुजली आहे.
रहाटणी : सध्याच्या धावपळीच्या युगात आरोग्याकडे लक्ष देण्यास अनेकांना वेळच नसतो. त्याचबरोबर सध्या प्रत्येक व्यक्तीस एक वाहन ही संकल्पना माणसाच्या मनात रुजली आहे. त्यामुळे वातावरणातील वायू प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे आबालवृद्धांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. यावर मात करण्यासाठी पिंपळे सौदागर येथील रोझलँड रेसिडेन्सी व एका कंपनीच्या वतीने ‘स्मार्ट सायकल शेअरिंग सेवा ‘पीईडीएल’ हा उपक्रम सुरूकरण्यात येणार आहे.
या सेवेची माहिती देताना आगम गर्ग म्हणाले, ‘‘शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याच पट्टीत वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रस्त्यावर दिवसेंदिवस वाहतूककोंडी व त्यामुळे वायुप्रदूषण वाढत आहे. वाढत्या प्रदूषणामुळे माणसाला अनेक श्वसनाचे आजार जडत आहेत. एकदा नागरिक हाकेच्या अंतरावर जाण्यासही दुचाकी किंवा चारचाकीचा वापर करण्यास मागे-पुढे पाहत नाहीत. त्यामुळे रस्त्याच्या कडेला पार्किंगची सोय असो वा नसो सर्रास पार्किंगमुळे रस्ता अरुंद होत आहे. या सर्वावर मात करायची असेल, तर अशा सेवेची गरज आहे. म्हणून रोझलँड सोसायटीच्या सभासदांच्या मदतीने परिसरातील हा पहिलाच उपक्रम या ठिकाणी सुरू करण्यात येत आहे.
ही सेवा सध्या रोझलँड रेसिडेन्सीपासून सुरू करण्यात येणार आहे. या सेवेचा उपयोग करून तुम्ही ‘पीईडीएल’च्या समर्पित ‘स्टेशन्स’ वरून सायकल वापरू शकता. जिथे रहिवाशांसाठी काही सायकली ठेवल्या जातील. या सायकलचा उपयोग करण्यासाठी वापरकर्त्यांना रु. १०.०० प्रति ३० मिनिटांसाठी आकारण्यात येतील. हे आपल्याला आपल्या क्षेत्राभोवती फिरण्यास
सक्षम करेल, जे आपल्याला चांगले आरोग्य, कमी प्रदूषण, कमी ट्रॅफिक आणि सर्वांत महत्त्वाचे चांगले जीवन देणारी ही सुविधा आहे.’’ या उपक्रमाची पाहणी नगरसेवक नाना काटे यांनी केली.