गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्याने दाखविलेल्या निष्काळजीपणामुळे सिलेंडरचा स्फोट ; महिला जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 02:21 PM2019-02-22T14:21:41+5:302019-02-22T14:24:19+5:30
मोशी येथे खोलीत एकट्याच राहणाऱ्या भारत गॅस एजन्सीच्या पांजरपोळ येथील वैष्णवी एजन्सीतून त्यांनी रेग्युलेटर आणि गॅस सिलेंडर घेतला.
पिंपरी : आळंदी रस्ता मोशी येथे राहणाऱ्या महिलेने सिलेंडरच्या गळतीबाबत तक्रार नोंदवूनही गॅस एजन्सीचा कर्मचारी वेळेत न पोहचल्यामुळे गॅस सिलेंडरचास्फोट झाल्याची घटना घडली. त्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना गुरुवारी (दि. २३ फेब्रु.) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. पोलिसांनी गॅस वितरकाच्या कर्मचाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश भागुजी हिंगणे (वय ५२) यांनी फिर्याद दिली आहे. वैष्णवी गॅस एजन्सीत काम करणाऱ्या नितीन नागरगोजे (वय २८) या कामगाराविरूद्ध भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांची बहीण रंजना या स्स्ते इमारतीतील खोलीत एकट्याच राहतात. वैष्णवी एजन्सीतून त्यांनी रेग्यलेटर आणि गॅस सिलेंडर घेतला. १६ फेब्रुवारी२०१९ रोजी त्यांनी रेग्युलेटरमध्ये बिघाड असल्याने गॅस गळती होत असल्याचे एजन्सीला कळविले. नागरगोजे यांच्याशी संपर्क साधल्यास ते दुरूस्त करून देतील असे एजन्सीतून सांगण्यात आले. मात्र नागरगोजे यांनी तक्रारदार ग्राहकाच्या घरी जाऊन गॅस सिलेंडर आणि रेग्युलेटरची प्रत्यक्ष तपासणी करणे आवश्यक होते. या बद्दल गांभीर्याने दखल न घेता, एजन्सीच्या कार्यालयात बसूनच ते फिर्यादीच्या बहिणीस गॅस सुरू करण्याबाबत सूचना देत होते. गॅस सिलेंडर आणि रेग्युलेटरमधील बिघाड दुरूस्त न करता, ते एजन्सीतून सूचना देवू लागले. ते मोबाईलवरून देत असलेल्या सुचनांचे पालन करत रंजना यांनी रेग्युलेटर सुरू केला. रेग्युलेटर सुरू करताच, गॅस गळतीने घरात स्फोट झाला. रंजना स्फोटात भाजल्याने गंभीर जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गॅस एजन्सीच्या कामगारावर निष्काळजीपणा दाखविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.