सिलिंडरचा स्फोट; चौघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 03:17 AM2018-06-16T03:17:50+5:302018-06-16T03:17:50+5:30
गॅस गळती होऊन घरातील सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. यामुळे लागलेल्या आगीत चार जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास पिंपरी नेहरुनगरात घडली.
पिंपरी - गॅस गळती होऊन घरातील सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. यामुळे लागलेल्या आगीत चार जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास पिंपरी नेहरुनगरात घडली. यामध्ये चौघे जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. स्फोटात घराचे पत्रे उडून गेले आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींमध्ये दुर्गेश सिंग (वय १२), शिवा सिंग (वय १०) हे दोघे साठ टक्के भाजले आहेत, तर संदीप सिंग (वय २१), लबलादेवी सिंग (वय ३२) यांचा समावेश आहे. संदीप आणि लबालादेवी हे दोघे झळांमुळे किरकोळ जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.
संदीप सिंग नेहरूनगरात राहतात. सकाळी नऊच्या सुमारास अचानक घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. हा स्फोट एवढा मोठा होता, की घराचे पत्रे उडाले. मोठा आवाज झाल्याने शेजारी-पाजारी सिंग यांच्या घराच्या दिशेने धावले. जमा झालेल्या नागरिकांनी या आगीची माहिती संत तुकारामनगर येथील अग्निशामक दलाला दिली. परंतु, अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी पोचण्यापूर्वीच स्थानिकांनी आग विझवली होती. या आगीत चार जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांना जास्त भाजले असून, जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. गॅसगळती झाल्यामुळे स्फोट झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जखमींना महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन जखमी होण्याच्या वर्षभरात तीन घटना घडल्या असून चिखली, सांगवी, वाल्हेकरवाडी परिसरातील सिलिंडरचा स्फोट होऊन किरकोळ जखमी होण्याचे प्रकार घडले आहेत.