दाभाडे, टकले, ओसवाल स्वीकृत सदस्य
By admin | Published: January 9, 2017 02:44 AM2017-01-09T02:44:20+5:302017-01-09T02:44:20+5:30
ळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी भाजपा, तळेगाव जनसेवा विकास समिती आणि तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे प्रत्येकी
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी भाजपा, तळेगाव जनसेवा विकास समिती आणि तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे प्रत्येकी एक सदस्याची वर्णी लागली. भाजपाचे इंदरमल ओसवाल, तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे विशाल अशोक दाभाडे आणि तळेगाव जनसेवा विकास समितीचे सचिन टकले यांची निवड झाली. आता सभागृहात सत्ताधारी महायुतीच्या सदस्यांची संख्या २२ झाली असून विरोधी पक्षाचे सात सदस्य आहेत.
शनिवारी दुपारी वाजता नगराध्यक्षा तथा पीठासन अधिकारी चित्रा जगनाडे यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत
सदस्य पदांसाठी निवडणूक प्रक्रियेस सुरवात झाली. सर्व निर्वाचित नवसदस्यांचे सभागृहात अभिनंदन करण्यात आले. ज्येष्ठ नगरसेवक बापुसाहेब भेगडे यांनी शहराच्या विकासकामात केवळ विरोधाला विरोध करणार नसलो तरी गैरव्यवहाराबाबत कठोर भूमिका घेण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी चंद्रभान खळदे यांचेही अभिनंदनपर भाषण झाले.
त्यानंतर आमदार बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे यांच्या उपस्थितीत उपनगराध्यक्ष सुनील शेळके, स्वीकृत नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक ए. एम. लांडगे आणि पोलीसांनी चोख कामगिरी केली.(वार्ताहर)