‘पप्पा लवकर घरी या...’ ‘तो’ काॅल ठरला अखेरचा; पोलीस कर्मचाऱ्याचा मोशीतील अपघातात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 02:37 PM2022-07-24T14:37:31+5:302022-07-24T14:37:39+5:30
मोशी येथील बनकरवस्ती येथे पुणे-नाशिक महामार्गावर शनिवारी (दि. २३) रात्री सव्वाएकच्या सुमारास हा अपघात झाला.
पिंपरी : पप्पा लवकर घरी या, आम्ही वाट पाहतोय, असे लहान मुलीने तिच्या वडिलांना फोनवरून सांगितले. त्यानंतर पोलीस कर्मचारी असलेले तिचे वडील घराच्या दिशेने निघाले; मात्र त्यांच्या चारचाकी वाहनाला अपघात झाला आणि पोलीस कर्मचाऱ्याचा अपघातातमृत्यू झाला. मोशी येथील बनकरवस्ती येथे पुणे-नाशिक महामार्गावर शनिवारी (दि. २३) रात्री सव्वाएकच्या सुमारास हा अपघात झाला.
विजयकुमार मनोहर आखाडे (वय ४०, रा. मेदनकरवाडी, चाकण, मूळगाव उपळाई बुद्रुक, ता. माढा, जि. सोलापूर), असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आखाडे हे पोलीस नाईक म्हणून चिंचवड पोलीस ठाण्यात कार्यरत होते. सर्व्हिलन्स पथकात ते होते. ११२ या हेल्पलाइनच्या प्रशिक्षणासाठी त्यांची निवड झाली होती. त्यासाठी चिंचवड येथे आटो क्लस्टर येथे प्रशिक्षण वर्गानंतर ते चिंचवड पोलीस ठाण्यात आले होते. तेथे त्यांनी सहकाऱ्यांची भेट घेऊन रात्री उशिरा घरी जाण्यास निघाले. त्यानंतर बनकरवस्ती येथे झाडावर आदळून त्यांच्या चारचाकी वाहनाला अपघात झाला. यात आखाडे गंभीर जखमी झाले. याबाबत माहिती मिळताच एमआयडीसी भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आखाडे यांना पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करून मूळगावी मृतदेह नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.
आई-वडिलांचे छत्र हरवले..
विजयकुमार आखाडे हे २००८ मध्ये पोलीस दलात रुजू झाले. पुणे शहर दलात त्यांची निवड झाली. त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत त्यांची बदली झाली. विजयकुमार यांचे वडील मनोहर हे सैन्य दलात होते. मनोहर यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यापाठोपाठ तीन वर्षांपूर्वी विजयकुमार यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यामुळे एकाकी पडलेल्या विजयकुमार यांना घरच्यांनी आणि मित्रांनी धीर दिला. आई, भाऊ आणि दोन मुलींसह विजयकुमार हे मेदनकरवाडी येथे रहात होते. पत्नीच्या निधनाच्या धक्क्यातून सावरत असतानाच विजयकुमार यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे त्यांची ११ वर्षांची पूर्वा व नऊ वर्षीय प्रिया या दोन लहान मुलींवर दु:खाचा आणखी एक डोंगर कोसळला. त्यांचे आई-वडिलांचे छत्र हरवले.