पिंपरीत दररोजच गांजा विक्रीच्या घटना; पुन्हा एका तरुणाला अटक, ४ हजारांचा १७६ ग्रॅम गांजा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 11:29 AM2021-06-22T11:29:52+5:302021-06-22T11:30:15+5:30
पिंपरीतील भोसरी येथे अंकुशराव लांडगे सभागृह परिसरात ही कारवाई करण्यात आली.
पिंपरी: पिंपरी चिंचवडमध्ये दररोज गांजा विक्रीच्या घटना घडू लागल्या आहेत. तरुणवर्ग या विळख्यात अडकला असून इतर नागरिकही गांजा विक्री आणि बाळगण्याला बळी पडू लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोघांना ठोकल्या बेड्या ठोकल्या होत्या. तर काल अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चार हजार ४०० रुपये किमतीचा १७६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. भोसरी येथे अंकुशराव लांडगे सभागृह परिसरात सोमवारी (दि. २१) सायंकाळी पाचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
सनी बबन शिंदे (वय २७, रा. भोसरी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस हवालदार बाळू कोकाटे यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे याच्याकडे गांजा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी कारवाई करून त्याला पकडले. त्याच्याकडून चार हजार ४०० रुपये किमतीचा १७६ ग्रॅम गांजा जप्त केला.
दोन दिवसांपूर्वी भाटनगर मध्ये झाली होती कारवाई
रविवारी अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून ४२ हजार ९०० रुपये किमतीचा एक किलो ७१६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
"अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. तरुण वर्गही या विळख्यात अडकू लागला आहे. नागरिकांनी सतर्क राहून अशा घटना पोलिसांना तातडीने कळवणे गरजेचे आहे. त्यामुळे गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणावर आळा बसू शकतो. असे आवाहन पोलीसांकडून करण्यात आले आहे."