एसटी स्थानकाची झाली दैना
By admin | Published: April 27, 2017 04:56 AM2017-04-27T04:56:49+5:302017-04-27T04:56:49+5:30
मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागाला जोडणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या तळेगाव बस स्थानक परिसराची देखभालीअभावी
तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागाला जोडणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या तळेगाव बस स्थानक परिसराची देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे. बस स्थानक परिसरात वर्षानुवर्षे अतिक्रमणे कायम आहेत.
कोकण, मुंबई, ठाणे व उत्तर पुणे जिल्हा, अहमदनगर जिल्ह्यांना जोडणाऱ्या वडगाव ते शिक्रापूर मार्गावरील तळेगाव दाभाडे हे महत्त्वाचे आगार व बस स्थानक आहे. या ठिकाणाहून लांब पल्ल्याच्या ६ एसटी बसच्या फेऱ्या होत असून, त्यापैकी २० बस येथील आगाराच्या आहेत.
बस स्थानकात पिण्याच्या पाण्याची वानवा आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. स्वच्छतागृहाची दुरवस्था आहे. त्यामुळे विशेषत: महिला प्रवाशांची कुचंबना होते.
बस स्थानक परिसरात खासगी व्यावसायिकांनी दुकाने थाटून अतिक्रमण केल्याचे पहावयास मिळते. अतिक्रमण हटविण्यास राज्य परिवहन (एसटी) मंडळाच्या प्रशासनाने हतबलता न दाखवता अतिक्रमणे हटवली पाहिजेत, असे जाणकर प्रवाशांचे म्हणणे आहे. येथील एसटीचे अधिकृत उपाहारगृह अनेक वर्षांपासून बंद आहे. ठेकेदाराला पुरेशी कमाई मिळत नसल्याचे कारण सांगितले जात असले, तरी इतर स्थानिक हॉटेलचालकांच्या त्रासाला वैतागून उपाहारगृह बंद केल्याचे बोलले जाते.
बस स्थानक परिसरात काही स्थानिक समाजकंटकामुळे येथील प्रशासनास अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. या बस स्थानकावरून सुमारे हजार ते बाराशे प्रवासी दररोज प्रवास करतात. मात्र, त्यांना येथे अस्वच्छतेचा सामना करावा लागतो. तळेगाव जनरल हॉस्पिटल येथे निवारा शेड नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. बहुतेक प्रवासी याच ठिकाणाहून बसमध्ये चढ-उतार करतात.(वार्ताहर)