धरण परिसर असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 05:56 AM2018-04-25T05:56:01+5:302018-04-25T05:56:01+5:30

लोणावळा परिसरातील भुशी धरण, लोणावळा व तुंगार्ली या धरणाचा पाणीसाठा संपत आला आहे.

The dam area is unsafe | धरण परिसर असुरक्षित

धरण परिसर असुरक्षित

लोणावळा : धरणांचा तालुका अशी ओळख असलेल्या मावळ तालुक्यातील धरणांमध्ये वारंवार होणारे पर्यटकांचे अपघात ध्यानात घेता या धरण परिसरांची सुरक्षा ही रामभरोसे असल्याचे अधोरेखित होत आहे. मावळ तालुका व लोणावळा परिसरात निसर्ग, अल्हाददायीपणा, धरणे, किल्ले, लेण्या, मंदिरे असा हा समृद्ध परिसर देशभरातील पर्यटकांना साद घालत असतो. मुंबई व पुणे या दोन शहरांच्या मध्यावर हा तालुका असल्याने याठिकाणी पर्यटनाकरिता येणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते. महाविद्यालयीन तरुण, तरुणी, आयटीपार्कमधील अभियंते, मुंबई भागातील उच्चभ्रू यांची संख्या तुलनात्मक दृष्ट्या जास्त असते. मावळ परिसरात निसर्गाचा निख्खळ आनंद घेण्याऐवजी जीव धोक्यात घालत धरणाच्या पाण्यात उतरणे, दरीच्या तोंडावर जाऊन सेल्फी काढणे, गड किल्ल्यांवर धोकादायक ठिकाणी जाणे असे प्रकार करतात व मरणाला आमंत्रण देतात. सोमवारी पवनाधरण व लोणावळ्यातील वलवण धरणात बुडून तीन जणांचा मृत्यू झाला. यापैकी दोन जण अल्पवयीन होते. पवना धरणात दोन महिन्यांपूर्वी देखील दोन पर्यटकांना बुडून झाला होता. वारंवार धरण परिसरात या घटना घडत असताना त्यावर नियंत्रण राखण्यात यंत्रणांना अपयश येत आहे. मावळ तालुक्यातील काही धरणे ही पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येतात तर काही टाटा कंपनीची खासगी धरणे आहेत. धरणांचा परिसर हा व्यापक असल्याने पर्यटक सुरक्षा जाळ्या भेदून पाण्यात उतरतात. अनेक वेळा पोहता येत नसताना देखील मित्रांच्या समवेत मौज म्हणून पाण्यात गेलेल्या अनेकांची मावळात प्राणज्योत मावळली आहे. खरं तर धरणाचा परिसर व बॅक वॉटरचा भाग पहाता यासर्व ठिकाणी सुरक्षा यंत्रणा नेमणे हे शक्य नसले तरी किमान सुरक्षा जाळ्या लावणे गरजेचे आहे. पोलीस प्रशासनाने देखील धरण भागात गस्त वाढवायला हवी.
लोणावळा परिसरातील भुशी धरण, लोणावळा व तुंगार्ली या धरणाचा पाणीसाठा संपत आला आहे. तरी देखील पाण्यात युवा पर्यटक उतरतात पाण्याचा अंदाज येत नसल्याने चिखलात गुंततात व मृत्यूला कवटाळतात. पवना धरण तसेच वलवण धरणाच्या डोंगराकडील भागातून पर्यटक सुरक्षा यंत्रणेचा
डोळा चूकवत पाण्यात उतरतात, जागेची अपुरी माहिती व पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने पर्यटक धरणात बुडण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत.
 

Web Title: The dam area is unsafe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण