वादळी पावसाचा पुणेकरांना दणका
By admin | Published: May 14, 2017 12:37 AM2017-05-14T00:37:03+5:302017-05-14T00:37:03+5:30
वादळी वाऱ्यासह झालेल्या धुवाधार पावसाने पुणेकरांना चांगलाच दणका दिला
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वादळी वाऱ्यासह झालेल्या धुवाधार पावसाने पुणेकरांना चांगलाच दणका दिला. पावसाने शहरातील अनेक झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे रविवारी पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची भीती आहे. प्रशासनाने पावसाळापूर्व कामांकडे दुर्लक्ष केल्याने पहिल्याच मोठ्या पावसाने दाणादाण उडविली. नालासफाई झाली नसल्याने आणि अनेक रस्त्यांवर चेंबर नसल्याने पाणी वाहून जाण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते.
शनिवारी दिवसभर ढगाळ हवामानामुळे उकाडा वाढला असतानाच रात्री आठच्या सुमारास अचानक आकाशात काळे ढग दाटून येऊन विजांच्या कडकडाटासह धुवाधार पाऊस सुरू झाला़ या पावसामुळे शहराच्या अनेक
भागांतील वीजपुरवठा खंडित
झाल्याने लोकांची तारांबळ उडाली़ सुमारे अर्धा तास सुरू असलेल्या या पावसाने अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला़
शहरात जवळपास ४० ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या़ काही ठिकाणी झाड पडल्याने त्याखाली सापडून अनेक दुचाकीचे नुकसान झाले़ या पहिल्या मोठ्या पावसामुळे शहरातील पाच उपकेंद्रे बंद पडल्याने शहरातील बहुतेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला़ वीजपुरवठा खंडित झाल्याने त्याचा परिणाम शहरात रविवारी होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर होणार आहे़ सिंहगड रस्त्यावर पु. ल. देशपांडे उद्यानानजीक झाड पडल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.
।पावसाने झोडपले
1.9 मिमी पावसाची नोंद रात्री साडेआठ वाजेपर्यंत वेधशाळेमध्ये झाली होती़
कात्रज परिसरात २० मिनिटे जोरदार पाऊस झाला़ तेथे ११ मिमी पावसाची नोंद झाली आहे़
39.6 अंश सेल्सिअस शहरातील कमाल तापमान असताना ढगाळ हवामानामुळे उकाड्यात वाढ झाली़ सायंकाळनंतर आकाश दाटून आले आणि काही वेळातच विजांचा कडकडाट सुरू झाला़ सिंहगड रोड, कात्रज, बिबवेवाडी, नगर रोड, येरवडा, कॅम्प, हडपसर, औंधसह शहराच्या सर्व भागांत अर्धा तास पाऊस पडत होता़
डेक्कन परिसरातील पूना हॉस्पिटलजवळील झाड पडल्याने वाहतूक खोळंबली होती.
।महावितरणचे कार्यालयही बुडाले अंधारात
या पावसामुळे महापारेषण कंपनीचे पुणे शहरातील कोंढवा, पर्वती, नांदेड सिटी हे २२० केव्हीचे तीन आणि रास्ता पेठ येथील १३२ केव्ही केंद्र रात्री ८ वाजून १२ मिनिटांनी बंद पडले़ यामुळे पर्वती, पद्मावती व रास्ता पेठ या विभागातील ५ लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला़
त्याच वेळी शहरातील इतर केंद्रांवर त्याचा भार आल्याने शहरातील विविध भागांत असलेल्या ट्रान्स्फॉर्मरही बंद पडले़ अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला़
महावितरणच्या रास्ता पेठ येथील मध्यवर्ती कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित झाला़ या ठिकाणी महावितरणचे कॉल सेंटर आहे़ वीजपुरवठा खंडित झाल्याने शहराच्या सर्व भागांतून या कॉलसेंटरला फोन
येत होते़ परंतु, तेथील वीजपुरवठा खंडित झाल्याने हे कॉलसेंटरही काही वेळ बंद पडले होते़ त्यामुळे तेथील फोन लागत नव्हते़ येणाऱ्या फोनची संख्या इतकी मोठी होती, की कॉलसेंटरमधील प्रतिनिधीपर्यंत कॉल पोहोचण्यास बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत होती़
महापारेषणची चारही उपकेंद्रे रात्री ९ वाजता सुरू झाली. त्यानंतर महावितरणचे उपकेंद्र सुरू झाले असून ९़३५ मिनिटांनी बहुतांश भागातील वीजपुरवठा सुरू झाला़ रात्री १० पर्यंत उर्वरित भागातील वीजपुरवठा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे महावितरणच्या जनसंपर्क कार्यालयातून सांगण्यात आले़ राजेंद्रनगर येथील पीएमसी कॉलनीत एक झाड पडले़ या झाडाखाली पार्क केलेल्या अनेक दुचाकीचे त्यामुळे नुकसान झाले़ सिंहगड रोडवरील पानमळा येथे रस्त्यावर झाड पडले़ त्यामुळे काही काळ सिंहगड रोडवरील वाहतूक थांबविण्यात आली होती़ पुणे स्टेशन परिसरात वाहतूककोंडी झाली होती़
सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी नजीकच्या खड्ड्यात साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक वाहनचालक घसरून पडले आणि जखमी झाले.
धायरी, किरकटवाडी, खडकवासला येथे रस्त्याच्या कडेला साचलेले कचऱ्याचे ढीग पावसामुळे रस्त्यांवर आले होते.
।पावसाने फांद्या पडून वाहतूककोंडी
वादळी पावसाने शहराच्या अनेक रस्त्यांवर झाडांच्या फांद्या पडून वाहतूककोंडी झाली. पाऊस सुरू झाल्यापासून रात्री उशिरापर्यंत महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे फांदी पडल्याच्या ३५ तक्रारी आल्या. त्यांची ८ वाहने जवानांसहित रस्त्यावर धावत होती व फांद्या बाजूला करून वाहतुकीला वाट करून देत होती. उद्यान विभागात मात्र शुकशुकाट होता.
रस्त्यावरच धोकादायक फांद्या काढून टाकण्याची जबाबदारी उद्यान विभागाची आहे. त्यासाठी त्यांच्याकडे स्वतंत्र कर्मचारीवर्ग व खास वाहनही आहे. नागरिकांकडून अनेकदा या खात्याकडे त्यांच्या परिसरातील अशा धोकादायक फांद्या काढून टाकण्याचे अर्ज करण्यात येत असतात, मात्र त्याची दखलच घेतली जात नाही, असे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे धोकादायक फांद्या व काही वेळा संपूर्ण झाडही तसेच राहते. थोडासा पाऊस झाला तरीही ते कोसळून पडतात.
शुक्रवारी सायंकाळीही पाऊस झाला होता, मात्र तो थोड्या वेळातच थांबला. शनिवारी सायंकाळी मात्र पावसाने चांगलाच जोर धरला. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही, मात्र रस्त्यावरच फांद्या पडल्यामुळे त्या त्या परिसरातील वाहतूक खोळंबली. त्यामुळे नागरिकांकडून उद्यान विभागाला फोन करण्यात येत होते. मात्र कार्यालय बंद झाल्यामुळे तेथून काही प्रतिसाद मिळत नव्हता.
अग्निशमन दलाला कळवल्यानंतर मात्र त्याची लगेचच दखल घेण्यात येत होती. त्यामुळेच त्यांच्या तब्बल ८ गाड्या शहरात फिरत होत्या. फांदी काढून जवान वाहनांना वाट करून देत होते. रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाला फोनवरून तक्रारी येत होत्या.