खांब काढण्यास दिरंगाई, दिघीकरांचा जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 01:34 AM2018-11-11T01:34:38+5:302018-11-11T01:35:00+5:30
महावितरणचे दुर्लक्ष : अपघाताच्या शक्यतेमुळे दिघीकरांचा जीव धोक्यात
दिघी : परिसरातील छत्रपती संभाजीमहाराज चौक ते सावंत नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर वीजवितरण कंपनीचे विद्युत खांब रस्त्यावर आल्याने दिघीकरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. खांब काढण्याची मागणी जुनी असून, समस्या कायम असल्याने येथील व्यापारी वर्गांनी वीजवितरण कंपनीच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
मुख्य बाजारपेठ असलेल्या छत्रपती संभाजीमहाराज चौकातील या रस्त्यावर वाहनांची नेहमीच गर्दी असते. रस्त्याच्या कडेला भाजी व्यावसायिक ठाण मांडून बसलेले असतात. अशा नागरी वर्दळीच्या रस्त्यावर वीजवितरण कंपनीचे विद्युत खांबसुद्धा अधिकची भर घालत समस्या निर्माण करीत आहेत. या विद्युत खांबामुळे वाहनधारकांना अडथळा निर्माण होत असल्याने समोरासमोर आलेल्या चार चाकी वाहने अडकून पडून वाहतूककोंडी होते.
रस्त्यावर आलेल्या विद्युत खांबावरून वीजग्राहकांना विद्युत जोड दिले आहेत. मात्र असंख्य विद्युत जोड दिल्याने खांबावर वायरीचे जाळे तयार झाले आहे. हिंदू कॉलनीकडे जाणारा विद्युत प्रवाहाच्या उघड्या तारा अचानक तुटल्याने शॉर्टसर्किट झाल्याचे अनेक प्रकार वारंवार घडत आहेत. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. तक्रार दाखल केली असता तात्पुरता वीजपुरवठा सुरळीत करून समस्या सोडविण्यात येते. मात्र समस्यांचे निराकरण होत नाही. अचानक शॉर्टसर्किट होऊन आगीचे गोळे पडणे, विद्युत उपकरणांचे होत असलेले नुकसान यामुळे सामान्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो़ शिवाय वाहनचालक, पादचारी नागरिकांना कधी इजा पोहोचवतील याची शाश्वती राहलेली नाही.
दिघी परिसरातील अनेक भागांत भूमिगत केबलची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे येथील उघड्या तारा निघाल्याने वीज समस्यांचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र मुख्य बाजारपेठ असलेल्या छत्रपती संभाजीमहाराज चौकातील मुख्य रस्ते, व रहिवासी भागातील भूमिगत केबलच्या कामांना मुहूर्त मिळत नसल्याने उघड्या वीज तारा डोकेदुखी ठरू पाहत असल्याने वीजवितरण कंपनीने समस्यांचे गांभीर्य ओळखून समस्या सोडविण्याची मागणी जोर धरू पाहात आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अनेक ठिकाणी उघड्या डीपी आहेत. त्यामुळेही अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्युत डीपी बंद करण्यासाठी किंवा तिला झाकणे बसविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होत नसल्याने अपघाताच्या शक्यता वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी लहान मुले रस्त्यावरून जाताना डीपी बॉक्सला हात लावतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. उघड्या डीपी बॉक्सकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.