वाढती असहिष्णुता धोक्याची - सुशीलकुमार शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 06:37 AM2017-10-04T06:37:43+5:302017-10-04T06:38:05+5:30
सहिष्णू अशी आपल्या राज्याची ओळख आहे. समता, समानता, सहिष्णू अशी निर्माण केलेली ओळख पुसण्याचे काम सुरूआहे. त्यामुळे
पिंपरी : सहिष्णू अशी आपल्या राज्याची ओळख आहे. समता, समानता, सहिष्णू अशी निर्माण केलेली ओळख पुसण्याचे काम सुरूआहे. त्यामुळे सर्वत्र असहिष्णुता वाढत आहे, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवारी चिंचवड येथे केली.
चिंचवड येथील आॅटो क्लस्टर सभागृहात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. डी. वाय़ पाटील अभिमत विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील होते.
ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या हस्ते माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार व उज्ज्वला शिंदे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रारंभी ‘जन्म घ्यावे कोटी कोटी अशा माऊलीच्या पोटी...’, ही कविता चंद्रकांत वानखेडे यांनी सादर केली. त्यांनतर यशवंत-वेणूचा अनुबंध उलगडला. शिंदे यांच्यासह माजी आमदार उल्हास पवार, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी यशवंतरावांचे अनेकविध पैलू उलगडले. व्यासपीठावर सुदाम भोरे, पुरुषोत्तम सदाफुले, रामदास फुटाणे, विठ्ठल वाघ उपस्थित होते. या वेळी नगरसेवक अमित गावडे, विजय जाधव, युवराज काटे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
शिंदे म्हणाले, ‘‘मी पुरस्कार स्वीकारणे बंद केले आहे. खरे तर पुरस्कार हे तरुणांना द्यायला हवेत. आज केवळ यशवंतरावांच्या प्रेमापोटी येथे आलो आहे. यशवंतराव उत्तम निरीक्षक होते.
खात्यातील प्रत्येक मंत्री आणि कार्यकर्त्याने कोणते काम किती चांगल्या प्रकारे केले आहे, याची माहिती त्यांना असत. राजकारण, समाजकारण, साहित्य, संस्कृती अशा विविध क्षेत्रांतील चोखंदळ नेता म्हणून त्यांचा लौकिक होता. प्रतिभा किंवा सर्वगुणसंपन्नता एखाद्या विशिष्ट समाजाकडे नसते, तर ती समाजातील कुणाकडेही असू शकते. प्रतिभा काही घर बघून येत नाही. माणसाने आयुष्यात कोणत्याही कामाची लाज न बाळगता मनगटातली ताकद आणि बुद्धीच्या जोरावर तरुणांनी काम करावे. विविध संस्थांनी युवकांना पुरस्कृत करून त्यांचे कार्य समाजासमोर आणावे. यशवंतरावांच्या सर्वधर्म समभावाचा विचार मी जागवितो आहे.’’
उल्हास पवार म्हणाले, ‘‘यशवंतरावांच्या साहित्य, कला, संस्कृतीचा वारसा शिंदे पुढे नेत आहेत. माणूस मोठा झाला की जमिनीवर पाय राहत नाहीत़ मात्र, मातीशी नाळ कायम ठेवणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या जीवनातील संघर्ष हा तरुणवर्गास दिशा देणारा आणि प्रेरणादायी आहे. ते उत्तम राजकारणी तर आहेतच त्याचबरोबर उत्तम कलावंतही आहेत. त्यांनी ‘लग्नाची बेडी’ या नाटकात काम केले होते. आजकाल महान नेतृत्वांना लहान करण्याचे काम सुरू आहे. ते चुकीचे आहे.’’ ‘‘यशवंतरावांची परंपरा पुढे नेण्याचे काम शिंदे यांनी केले आहे. महाराष्टÑातील येणाºया पिढीला त्यांचे विचार हे प्रेरणादायी ठरणारे आहेत, असे मत डॉ. पाटील यांनी व्यक्त केले.
प्रास्ताविक पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले. सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले. राजेंद्र वाघ यांनी आभार मानले.
शिंदे यांनी पत्नी उज्ज्वला यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘राजकारणात येण्यासाठी पोलीस खात्यातील नोकरी सोडली. नंतर तिकीटही कापले गेले. नोकरी गेली. तेव्हा पत्नीनेच भक्कम आधार दिला. पत्नी ही कधी बहीण, प्रेयसी, आईही असते. आपल्या आयुष्यात आणि यशात ती सर्व भूमिका पार पाडत असते.’’