वंशाच्या दिव्यासाठी अघाेरी प्रकार; विवाहितेच्या छळप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 07:47 PM2021-05-04T19:47:27+5:302021-05-04T19:48:17+5:30
आरोपींनी विवाहितेकडे लग्नातील मानपानासाठी माहेरहून २५ लाख रुपये आणण्याची मागणी केली.
पिंपरी : विवाहितेला मुलगा व्हावा म्हणून तिच्या सासरच्यांनी अघोरी प्रकार केले. माहेरहून २५ लाख रुपये आणण्याची मागणी करून तिला व तिच्या कुटुंबियांना संपवून टाकण्याची धमकी दिली. रहाटणी येथे ५ डिसेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत ही घटना घडला.
याप्रकरणी ३१ वर्षीय विवाहितेने सोमवारी (दि. ३) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती प्रशांत रमेश लोहार (वय ३२), सासू मीना रमेश लोहार (वय ५०), नणंद हर्षदा भूषण मेहता (वय २८, सर्व रा. रहाटणी), अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी विवाहितेकडे लग्नातील मानपानासाठी माहेरहून २५ लाख रुपये आणण्याची मागणी केली. त्यावरून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. याबाबत विवाहितेने पतीला सांगितले. त्यानंतर पतीनेही विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण केली. विवाहितेला मुलगा व्हावा यासाठी राम मामा महाराज (रा. रहाटणी) याच्या सांगण्यावरून सासूने विवाहितेच्या डोक्यावर लिंबू कापणे, महाराजांनी दिलेला अंगारा चहा, नाष्ट्यामधून खाऊ घालणे, असे अघोरी प्रकार केले. किशोर पंडित (रा. वाघोली) या महाराजाच्या सांगण्यावरून विवाहितेला रात्र-रात्र एकाच कुशीवर झोपण्यास भाग पाडले.
तू मला घटस्फोट दे, नाहीतर तुला व तुझ्या संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकेन, अशी विवाहितेला धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक सपना देवतळे तपास करीत आहेत.