पिंपरीतील वाकडमध्ये धोकादायकरित्या गॅसची चोरी; दोघ अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2021 06:24 PM2021-08-09T18:24:21+5:302021-08-09T18:24:55+5:30
पिंपरी - चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई
पिंपरी : गॅस सिलेंडरमधून गॅस चोरी केल्याप्रकरणी दोघांना अटक केली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने शनिवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास वाकड रोड, वाकड येथील सिद्धनाथ गॅस सर्विस येथे ही कारवाई केली. दादा विठोबा मेटकरी (वय ३४, रा. थेरगाव), महेंद्र खियाराम ईसरवाल (वय ५०, रा. डांगे चौक, वाकड), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस कर्मचारी नितीन लोंढे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादा मेटकरी याचे वाकड रोडवर सिद्धनाथ गॅस सर्व्हिस हे दुकान आहे. त्याने दुकानामध्ये इंण्डेन गॅस कंपनीचे गॅस सिलेंडर अतिप्रमाणात साठा करून ठेवले. तसेच धोकादायकरित्या एका सिलेंडरमधून दुसऱ्या सिलेंडरमध्ये गॅस चोरी केली. यासाठी त्याने कोणत्याही प्रकारची सुरक्षेची काळजी घेतली नाही. आरोपींनी घरगुती भरलेल्या सिलेंडरमधून चार किलो वजनाच्या गॅस सिलेंडर टाकीमध्ये गॅस काढून घेऊन गॅसची चोरी केली. तसेच ग्राहकांची फसवणूक केली. पोलिसांनी कारवाई करून रोख रक्कम, ॲपे रिक्षा, गॅस व इतर साहित्य, असा एकूण एक लाख २७ हजार २८७ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक धैर्यशील सोळंके तपास करीत आहेत.