यंत्रांच्या सुट्या भागांची धोकादायक वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 04:51 AM2018-04-23T04:51:46+5:302018-04-23T04:51:46+5:30
तळवडेगावच्या हद्दीत विविध कारखाने असून, येथे कारखानदारीसाठी लागणारे विविध सुटे भाग तयार केले जात असतात.
देहूगाव : देहू-आळंदी रस्त्यावरील तळवडेजवळील देवी इंद्रायणी सोसायटीसमोरील एका कारखान्यात तयार होत असलेल्या यंत्राचे मोठे सुटे भाग कोणत्याही प्रकारची सुरक्षितता न बाळगता राजरोसपणे वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करीत अवजड वाहनांवर चढविले जात आहेत. तसेच त्याची धोकादायकरीत्या वाहतूकही केली जाते. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होण्यासह अपघातालाही निमंत्रण ठरत आहे. अशा वाहनांवर व कारखान्यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
तळवडेगावच्या हद्दीत विविध कारखाने असून, येथे कारखानदारीसाठी लागणारे विविध सुटे भाग तयार केले जात असतात. मात्र काही सुटे भाग मोठ्या आकाराचे व अवजडही असतात. सुटे भाग वाहनांवर चढवून इच्छित कारखान्यात पोहोचविण्याचे काम केले जाते. हे काम करताना अवजड वाहने, क्रेन रस्त्याच्या कडेलाच लावून हे सुटे भाग वाहनांवर चढविण्याचे काम केले जात असते. देहू-आळंदी ही दोन्ही तीर्थक्षेत्रे असून, या रस्त्याने वाहनांची वर्दळ असते. शिवाय याच रस्त्याने तळेगाव, चाकण, नवलाख उंबरे या भागात कामगारांची वाहतूक करणाऱ्या बसही मोठ्या प्रमाणात जातात. दरम्यान, भर रस्त्यावर अशा प्रकारे अवजड अशा सुट्या भागांची चढ-उतार करणे हे धोक्याचे असतानाही त्याकडे डोळेझाक केली जात आहे. यासाठी संबंधित यंत्रणेची कोणतीही परवानगी घेतली जात नाही. वाहतूक न थांबविताच हे काम केले जाते यासाठी कोणत्याही प्रकारचा धोका दाखविणारे झेंडे इतर वाहनचालकांना दाखविले जात नाही अथवा सावधानतेचा कोणताही इशारा दिला जात नाही. पोलिसांचे मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे.