विद्यार्थ्यांचा होडीतून धोकादायक प्रवास , पहिल्या दिवसापासूनच शाळेसाठी कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 03:25 AM2018-06-16T03:25:18+5:302018-06-16T03:25:18+5:30
नाणोली व वराळे गावातील शेतकरी व महिलांबरोबर शाळेसाठी विद्यार्थ्यांना होडीतून धोकादायकरीत्या प्रवास करावा लागत आहे. ग्रामस्थांनी अनेकदा मागणी करूनही या नदीवर पूल उभारला जात नसल्याने तीन पिढ्यांपासून विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शाळेसाठी कसरत करावी लागते.
- विजय सुराणा
वडगाव मावळ : नाणोली व वराळे गावातील शेतकरी व महिलांबरोबर शाळेसाठी विद्यार्थ्यांना होडीतून धोकादायकरीत्या प्रवास करावा लागत आहे. ग्रामस्थांनी अनेकदा मागणी करूनही या नदीवर पूल उभारला जात नसल्याने तीन पिढ्यांपासून विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शाळेसाठी कसरत करावी लागते. पावसाळ््यात इंद्रायणी नदीला पूर असल्यानंतर होडीतील प्रवासात धोक्याची शक्यता अधिक बळावते. शाळेच्या पहिल्या दिवसांपासून ही कसरत सुरू झाली आहे.
मावळ तालुक्यातील अतिदुर्गम भागात नागरिकांना प्रवासासाठी रस्ते व पुलाची सुविधा नाही. त्यामुळे नाणोली गावच्या ग्रामस्थांना होडीशिवाय इंद्रायणीच्या अलीकडे-पलीकडे जाण्याचा दुसरा मार्गच नाही. नाणोली गावची लोकसंख्या सुमारे तेराशे आहे. वराळे व तळेगावला जाण्यासाठी त्यांना जवळचा मार्ग म्हणून होडीचा प्रवास करावा लागतो. नाणोली, वराळे व इतर गावांतील मुले-मुलींना शाळेत जाण्यासाठी होडीचा वापर अपिरहार्य आहे.
नव्या होडीची आशा
वराळे-नाणोली इंद्रायणी नदीवर पूल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. सध्याची होडी निकामी झाली असून, नवीन होडी द्यावी, तसेच पुलाचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी माजी सभापती धोंडिबा मराठे, माऊली मराठे, विशाल लोंढे, अरुण लोंढे, संतोष लोंढे, मल्हारी कोंडे यांनी केली आहे. जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांनी, जिल्हा परिषदेकडून नवीन नाव लवकर आणण्याचे आश्वासन दिले.
तीन पिढ्यांचा व्यवसाय
सुरुवातील दत्तोबा गव्हाणे यांनी होडीतून प्रवासाचा व्यावसाय सुरू केला. त्यानंतर मुलगा बळीराम आणि सून बिबाबाई याही हाच व्यवसाय करीत आहेत. या मोबदल्यात पैसे न घेता धान्य घेतले जायचे. ग्रामस्थांची व शालेय विद्यार्थ्यांची सेवा आमच्या हातून घडते हे आमचे भाग्य आहे.परंतु महागाईचे दिवस आहेत. नुसत्या धान्यावर घर चालत नाही. शासन वा दोन्ही ग्रामपंचायतींनी मानधन दिले पाहिजे, असे बिबाबाई गव्हाणे यांनी सांगितले.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता
इंद्रायणीच्या पलिकडे जाण्यासाठी असलेल्या होडीची अवस्था बिकट असून, तळाला छिद्रे पडली आहेत. त्यामुळे होडीत काही प्रमाणात पाणी घुसते. नदीपात्राच्या दोन्ही बाजूंना झाडाच्या खोडाला तारा व दोरखंड बांधले आहेत. त्या आधारे होडी ओढून पुढे नेली जाते. आता पावसाळा सुरू झाला आहे. अचानक पाऊस वाढल्यास नदीला पूर येतो, त्यावेळी आपत्कालीन व आणीबाणीच्या परिस्थिती प्रवाशांना वाचविण्याची कोणतीही पर्यायी व्यवस्था याठिकाणी नाही. नाणोली व वराळे ग्रामस्थांसाठी तातडीने पर्यायी व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे.