दापोडी-पिंपरी मार्गावर होणार डिसेंबरअखेर मेट्रोची ट्रायल रन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 02:59 AM2019-03-02T02:59:29+5:302019-03-02T02:59:34+5:30
महामेट्रोची माहिती : महापालिकेच्या हद्दीतील ५३ टक्के काम पूर्ण
पिंपरी : पुणे-मुंबई महामार्गावरील पिंपरी ते दापोडी मेट्रो मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत ५३ टक्के काम पूर्ण झाले असून, डिसेंबरअखेर पिंपरी महापालिकेच्या हद्दीत मेट्रोची ट्रायल रन करण्याची तयारी सुरू आहे.
महामेट्रोकडून पहिल्या टप्प्यातील स्वारगेट ते पिंपरी मार्गाचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. साधारण १६.५ किलोमीटरपैकी पिंपरी ते रेंजहिल हा मार्ग एलेव्हेटेड आहे. त्यानंतर स्वारगेटपर्यंत हा मार्ग भुयारी असणार आहे. रेंजहिल परिसरात भुयारी मेट्रोचे काम सुरू आहे. साधारण दोन वर्षे या कामासाठी लागणार असल्याचा महामेट्रो प्रशासनाचा दावा आहे. दरम्यानच्या काळात विधानसभा निवडणुकीपूर्वी पिंपरी महापालिकेच्या हद्दीतील सुमारे साडेसहा किलोमीटरच्या हद्दीतील मेट्रो मार्गाचे काम पूर्ण करण्याची तयारी सुरू आहे.
खराळवाडी ते एचएपर्यंतची वाहतूक खुली
पिंपरी महापालिका हद्दीत मेट्रोचे काम सुरू असल्याने जुन्या महामार्गावरील मध्यवर्ती लेनच्या बाजूला सुरक्षेसाठी पत्र्याचे फलक उभारण्यात आले आहेत. खराळवाडी ते एचए कंपनीच्या बस थांब्यापर्यंत मेट्रो उभारणीचा टप्पा पूर्ण
झाला आहे. त्यामुळे या भागातील सुरक्षेसाठी उभारण्यात आलेले फलक हटवून हा संपूर्ण टप्पा वाहतुकीसाठी खुला केला आहे. या ठिकाणी दोन पिलरवर रंगरंगोटी करण्यात आली आहे, अशी माहिती बिºहाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पिंपरी महापालिका हद्दीत भूसंपादनाचा अडथळा नसल्याने मेट्रोसाठी फाउंडेशन, पिलर, कॅप व स्पॅन उभारण्याचे काम गतीने सुरू आहे. आतापर्यंत मेट्रोच्या खांबाचे २८१ फाउंडेशन, २१३ खांबांची उभारणी, १४१ खांबांवरील कॅप व ८९ व्हायाडक्ट स्पॅनचे काम पूर्ण झाले आहे. संत तुकारामनगर व फुगेवाडी येथे मेट्रो स्टेशनचे काम सुरू झाले आहे. काही प्रमाणात नाशिक फाटा येथे आव्हानात्मक काम करावे लागत आहे. मेट्रोच्या कामाच्या प्रगतीबरोबर वाहतूककोंडी सोडविण्यासाठी टप्प्याटप्प्याने महामार्ग खुला करण्यात येत आहे.
- गौतम बिऱ्हाडे, कार्यकारी संचालक, महामेट्रो