दापोडीतील आई उद्यानाची दुरवस्था
By admin | Published: June 2, 2017 02:21 AM2017-06-02T02:21:56+5:302017-06-02T02:21:56+5:30
दापोडीतील गणेशनगर येथील महापालिकेच्या आई उद्यानातील करपलेली झाडे, प्रवेशद्वाराचे रखडलेले काम, तुटलेली खेळणी
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळे गुरव : दापोडीतील गणेशनगर येथील महापालिकेच्या आई उद्यानातील करपलेली झाडे, प्रवेशद्वाराचे रखडलेले काम, तुटलेली खेळणी, उघडा डीपी बॉक्स, पिण्याच्या पाण्याची गैरसोय, टवाळखोरांचा त्रास आदींमुळे उद्यानाला उतरती कळा आली आहे.
महापालिकेच्या प्रशस्त तीन एकर जागेत आई उद्यान साकारले आहे. या उद्यानात तीन सुरक्षारक्षक, तीन महिला व दोन षुरुष कामगार कार्यरत आहेत. उद्यानात एकच विंधन विहीर व अपुऱ्या पाणीपुरठ्यांमुळे उद्यानातील विविध प्रकारची झाडे करपून चालली आहेत. त्यामध्ये विविध फुलझाडे, डुरांडा, सायप्रस, विविध शोभेच्या झाडांचा समावेश आहे. तसेच लॉन सुकलेले आहे. चार महिन्यांपासून प्रवेशद्वाराचे काम अर्धवट स्थितीत रखडले आहे. उद्यानातील खेळणी (झोका) तुटलेला आहे. मुलांच्या संख्येच्या प्रमाणात अपुरी खेळणी आहेत. उद्यानात उघडा डीपी बॉक्स आहे. त्यामुळे अपघाताचा धोका नाकारता येत नाही. पिण्याच्या पाण्यासाठी एक सिमेंटची टाकी आहे. तीही धुतली नसल्याने पाणी भरलेले नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
असुविधांचे आगार
प्रवेशद्वाराचे काम रखडल्यामुळे बाजूचा परिसर खुला असल्यामुळे टवाळखोरांचा त्रास वाढत आहे. सुरक्षा भिंतीची उंची कमी असल्यामुळे टवाळखोर भिंतीवरून ये-जा करतात. मद्यपान करणाऱ्या दारूड्यांचा वावर वाढला आहे. आईची मूर्ती बसविण्यासाठी गोलाई बनवली आहे. त्यामध्ये वारूळ बनले आहे. तसेच येथील खेळण्यांची दुरवस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे. डीपी बॉक्स नेहमी उघडाच असल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो.
वाढत्या लोकसंख्येच्या मानाने उद्यानात अपुऱ्या सोयी आहेत. यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाने उद्यानाची दुरवस्था पाहवी. त्यामुळे बालचमू व ज्येष्ठ नागरिकांची हिरेमूड होत आहे. उद्यानात गेल्यानंतर सुकलेली झाडे पाहवी लागतात.
- माई काटे, नगरसेविका
प्रवेशद्वाराचे काम रखडल्यामुळे खुल्या जागेतून ये-जा करणाऱ्या टवाळखोरांचा त्रास वाढला आहे. रात्रीच्या वेळी मद्यपान करणाऱ्यांचा वावर वाढला आहे. सुरक्षा भिंतीची उंची कमी असल्याने टवाळखोर भिंतीवरून ये-जा करतात. आम्ही सुरक्षारक्षक असल्याने दाद दिली जात नाही. आम्हाला टवाळखोरांकडून दमदाटी होते.
- सुशील गायकवाड, सुरक्षारक्षक
वारंवार लेखी निवेदने देऊनही उद्यान विभागाने दखल घेतली नाही. उद्यानासाठी टेंडर नसल्याचे वारंवार सांगण्यात येते. गेली एक वर्षापासून पाठपुरावा सुरू आहे. उद्यान विभागाकडून सहकार्य मिळत नसल्याने सर्व नगरसेवक आंदोलन करणार आहोत.
- रोहित काटे, नगरसेवक