दौंड बसस्थानक बनले अवैध धंद्यांचे आगार
By admin | Published: May 12, 2017 04:44 AM2017-05-12T04:44:57+5:302017-05-12T04:44:57+5:30
दौंड शहरापासून लांब, इमारतीची झालेली दुरवस्था, सुविधांची वानवा यांमुळे दौंड शहरातील बस स्थानक असुविधांचे आगार बनले आहे.
मनोहर बोडखे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दौंड : दौंड शहरापासून लांब, इमारतीची झालेली दुरवस्था, सुविधांची वानवा यांमुळे दौंड शहरातील बस स्थानक असुविधांचे आगार बनले आहे. रात्रीच्या वेळी तळीरामांनी या स्थानकाला आपला अड्डा बनवला आहे. याबरोबरच इतर अवैध प्रकार स्थानक परिसरात होत असल्याने या ठिकाणी रात्रीचे येणे प्रवासी टाळतात. या प्रकारामुळे दौंडेचे स्थानक हे असुविधांचे केंद्र बनले आहे.
दौंड बस स्थानक हे शहरापासून दूर आहे. यामुळे एवढ्या लांब येण्यायेवजी रेल्वेने प्रवास करण्यास प्रवासी प्राधान्य देतात. या स्थानकात अनेक गैरसोयी तसेच पायाभूत सुविधांची वानवा आहे. देखभाल-दुरुस्तीअभावी इमारतीला बकाल स्वरूप आले आहे.
रात्रीच्या वेळी तळीरामांनी या स्थानकाला आपला अड्डा बनविल्याने या परिसरात फिरणे प्रवासी टाळतात. बस स्थानकातील व्यापारी गाळे अनेक वर्षांपासून बंद आहेत.
प्रवाशांना बसण्यासाठी बांधलेली सिमेंटची आसने तुटलेली आहेत. यामुळे प्रवाशांना उभे राहूनच बसगाड्यांची वाट पाहावी लागते. या ठिकाणी असलेल्या स्वच्छतागृहात कायम दुर्गंधी असते. यामुळे या स्वच्छतागृहात न जाताच उघड्यावरच प्रवासी विधी उरकतात.
सर्वाधिक गैरसोय होते ती महिला प्रवाशांची. स्थानकातील अस्वच्छतेमुळे डासांची पैदास वाढली आहे. भरदिवसा त्यांचा उपद्रव प्रवाशांना सहन करावा लागत असल्याने प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घाणीच्या साम्राज्यातच एसटी कंट्रोलरचे कार्यालय आहे. या अस्वच्छतेतच एसटी कंट्रोलरचे कामकाज चालते. स्थानकात चुकून तुरळक बसगाड्या येतात; मात्र लांब पल्ल्याच्या गाड्या बाहेरूनच निघून जातात. तालुक्याअंतर्गत बससेवा आणि दोन ते तीन लांब पल्ल्याच्या गाड्या, की ज्या दौंड डेपोच्या आहेत, त्यांचीच वर्दळ स्थानकात असते. बस स्थानक दूर असल्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या नगरमोरी चौकात थांबतात. त्यामुळे प्रवाशांना गावातून नगरमोरी चौकात दोन किलोमीटर जावे लागते. परिणामी, प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. काही गाड्या रेल्वे स्थानक परिसरात येतात; मात्र त्या तालुक्याअंतर्गत असतात. स्थानकाची जुनी इमारात पाडून नव्याने स्थानक उभारण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.