मध्य प्रदेशातून आणलेले पिस्तूल विकणाऱ्यास अटक, चार पिस्तूल जप्त; गुन्हे शाखेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 10:18 AM2024-07-04T10:18:19+5:302024-07-04T10:19:31+5:30
या पिस्तूल विक्रेत्याला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली. त्याच्यासह त्याच्या एका साथीदाराला देखील अटक केली. त्यांच्याकडून चार पिस्तूल आणि सहा काडतुसे जप्त केली....
पिंपरी : अहमदनगर येथील गुन्हेगार मध्य प्रदेशमधील सीमा भागात जाऊन तिथल्या स्थानिकांना हाताशी धरून तिथून पिस्तूल खरेदी करून आणत असे. तिथून आणलेले पिस्तूल महाराष्ट्रभर फिरून गुन्हेगारांना विकत असे. या पिस्तूल विक्रेत्याला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली. त्याच्यासह त्याच्या एका साथीदाराला देखील अटक केली. त्यांच्याकडून चार पिस्तूल आणि सहा काडतुसे जप्त केली.
दुर्गेश बापू शिंदे (३७, रा. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या पिस्तूल विक्रेत्याचे नाव आहे. त्याच्यासह प्रवीण उर्फ डॉलर सीताराम ओव्हाळ (३२, रा. राजगुरूनगर, ता. खेड. मूळ रा. वाळद, ता. खेड, पुणे) याला अटक केली. पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिस्तूल विक्रीसाठी एकजण चिंचवड गावात आला असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला असता संशयित दुर्गेश शिंदे याला पोलिसांची चाहूल लागली. त्यामुळे तो पळून जात असताना पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली. दुर्गेश याचा साथीदार प्रवीण ओव्हाळ याला खेड परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली.
दुर्गेश हा मध्य प्रदेशमधील सीमा भागात जाऊन स्थानिक लोकांना हाताशी धरून तिथून देशी बनावटीची पिस्तूल खरेदी करतो. ते पिस्तूल महाराष्ट्रभर फिरून इथल्या गुन्हेगारांना दुप्पट किमतीने विकतो. दुर्गेश याच्यावर सोलापूर, पुणे ग्रामीण, अहमदनगर जिल्हा, पिंपरी-चिंचवड येथे गुन्हे दाखल आहेत. तो चिंचवड पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्यात फरार होता. प्रवीण ओव्हाळ हा शिरूर व खेड पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार आहे. त्याने शिरूर परिसरात पिस्तूल आणि घातक हत्यारांसह महाराष्ट्र बँकेवर दरोडा टाकून लाखो रुपये लुटले होते. घोडेगाव परिसरातून त्याने एका कुख्यात गुंडाचे अपहरण करून त्याचा खून केला होता.
गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलिस उपनिरीक्षक गणेश माने, केराप्पा माने, पोलिस अंमलदार प्रमोद वेताळ, जयवंत राऊत, देवा राऊत, आतिश कुडके यांच्या पथकाने ही कामगिरी केली.