ढिगाऱ्याखाली सापडून चिमुकल्याचा मृत्यू :महापालिकेच्या ड्रेनेजचे काम सुरु असताना खचली भिंत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 09:07 PM2019-05-04T21:07:00+5:302019-05-04T21:07:48+5:30
लोकेश सनोज ठाकुर (वय ७) असे या घटनेत मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. सहायक पोलीस निरिक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिलेली माहिती अशी, ठाकूर कुटुंबिय कासारवाडीतील गुलिस्ताननगर येथील सर्व्हे क्रमांक ४९७ मधील यशवंत प्राईड सोसायटीच्या इमारतीलगतच्या खोलीत रहायला आहे
पिंपरी : ड्रेनेजचे काम सुरु असताना एका इमारतीची सिमाभिंत खचली. या भिंतीच्या ढिगारयाखाली सापडल्याने पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास कासारवाडी येथे घडली.
लोकेश सनोज ठाकुर (वय ७) असे या घटनेत मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. सहायक पोलीस निरिक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिलेली माहिती अशी, ठाकूर कुटुंबिय कासारवाडीतील गुलिस्ताननगर येथील सर्व्हे क्रमांक ४९७ मधील यशवंत प्राईड सोसायटीच्या इमारतीलगतच्या खोलीत रहायला आहे. शनिवारी दुपारी ठाकूर यांचे घर आणि यशवंत प्राईड सोसायटीची इमारत यांच्यात असलेल्या बोळीतच महापालिकेच्या ड्रेनेजचे काम सुरु होते. यावेळी यशवंत प्राईड इमारतीची सिमाभिंत अचानक खचली. दरम्यान, याठिकाणी ड्रेनेजचे काम करणारया कामगारांसह एक मुलगा या ढिगारयाखाली अडकला. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी दोन कामगारांना बाहेर काढले. त्यानंतर लोकेशला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते. मात्र, लोकेश सापडत नव्हता. अग्निशामक दलाच्या जवानांसह स्थानिक नागरिकांनीही मतदकार्यात सहभाग नोंदविला. अखेर तीन तासांच्या प्रयत्नानंतर पावणे सातच्या सुमारास ढिगारयाखाली लोकेश सापडला. त्याला बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याला मृत घोषित करण्यात आले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. लोकेश हा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या छत्रपती शाहू महाराज इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता पहिलीमध्ये शिकत होता.
या घटनेबाबत अग्निशामक दलाला माहिती मिळताच अग्निशामक दलाचे उपअग्निशामक अधिकारी प्रताप चव्हाण, फायरमन अनिल डिंबळे, विवेक खांदेवाड, अमोल चिपळूणकर, प्रमोद जाधव, शांताराम घारे घटनास्थळी दाखल झाले. तातडीने सर्व ढिगारा हटविण्याचे काम हाती घेण्यात आली. जागा अरुंद असल्याने काहीप्रमाणात मदतकार्यात अडथळा येत होता. दरम्यान, स्थानिक नागरिकांनीही मदत केली.
लोकेश राहत असलेले घर आणि यशवंत प्राईड सोसायटीची इमारत यांच्यात छोटीशी बोळ आहे. या बोळीतच ड्रेनेज असून या ड्रेनेजचे काम शनिवारी सुरु होते. दरम्यान, शनिवारी दुपारी लोकेशची आई काही कामानिमित्त घरातून बाहेर पडली. आईच्या पाठोपाठच लोकेश देखील चालला होता. दोघांमध्ये काही अंतर होते. आई पुढे गेली असता लोकेश मागे असतानाच भिंत कोसळली. या भिंतीखाली लोकेश सापडला.