मोशी कचरा डेपोमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ, डंपरच्या साह्याने उचलला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 10:07 AM2020-07-10T10:07:55+5:302020-07-10T10:19:15+5:30
कोरोनामुळे मृतदेह उचलण्यासाठी कुणी तयार होईना..
मोशी: येथील कचरा डेपो मध्ये गुरुवारी रात्रीच्या सुमारास एक मृतदेह आढळला असल्याचे समजताच परिसरात खळबळ उडाली आहे.कोरोनाच्या भीतीमुळे मृतदेह उचलण्यास पुढे कुणी येत नसल्याने शेवटी डंपरच्या साह्याने तो मृतदेह उचलण्यात आला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दिवसभर आलेल्या गाड्याचे डंपिंग करण्याचे काम जेसीबीच्या साहाय्याने सुरू होते. हे काम चालू असताना जेसेबी चालकाला कचऱ्यात काही तरी असल्याचे लक्षात आले असता त्यांनी कर्मचाऱ्यांना याबाबत कल्पना दिली. त्यानंतर त्या ठिकाणी मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. मृतदेहाची ओळख पटलेली नाही.मृतदेह दिसत असतानाही कोरोनाच्या भीतीने मृतदेह बाजूला काढण्यास भीती वाटत होती.
मोशीतील कचरा डेपोमध्ये संपूर्ण शहराचा कचरा आणून टाकण्यात येत असतो.शहराचा ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करते. हा कचरा गोळा करण्याचे काम दोन बड्या कंपन्यांना देण्यात आले आहे. तर या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मुंबईतील अँथनी लारा इन्व्हयरो प्रा ली कामकाज आहे. कचरा डेपोमध्ये मृतदेह आढळून आल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.कचरा डेपोत येणाऱ्या प्रत्येक गाडीची चौकशी करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदार कंपनीची आहे. असे असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पुढील तपास भोसरी एम आय डी सी पोलीस करत आहेत.