रस्त्यावर शिर सलामत ठेवले नाही म्हणून मुकले जिवाला; ११ महिन्यांमध्ये दुचाकींचे ३२५ अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 05:43 PM2020-12-10T17:43:09+5:302020-12-10T17:46:36+5:30
हेल्मेट असते तर वाचला असता जीव
नारायण बडगुजर-
पिंपरी : उद्योगनगरीत यंदा जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांमध्ये दुचाकींचे ३२५ अपघात झाले. यात १२९ दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. डोक्याला जबर मार लागून अनेक जण गतप्राण झाले. हेल्मेटचा वापर केला असता तर त्यातील काही जणांचा जीव वाचला असता, असे प्रत्यक्षदर्शी तसेच डाॅक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरीही रस्ते अपघात कमी होताना दिसून येत नाहीत. यात दुचाकींच्या भीषण अपघातात अनेकांना जीव गमवावा लागत आहे तर अनेकांना आयुष्यभरासाठी अपंगत्व येत आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असे अपघात वाढत असल्याचे दिसून येते. अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. वाहतूक नियमनासोबत जनजागृती करण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते प्रशस्त आहेत. त्यामुळे दुचाकीचालक भरधाव वाहने चालवितात. परिणामी बहुतांशवेळा दुचाकीवरील ताबा सुटून अपघात होतात. २०१९ मध्ये दुचाकींचे २९५ अपघात झाले होते. यात हेल्मेटचा वापर न केल्याने डोक्याला मार लागून मृत्यू झालेल्या दुचाकीस्वारांचे प्रमाण ३६ टक्के आहे. सायंकाळी सहा ते रात्री नऊ दरम्यान अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे. तसेच सकाळी सहा ते नऊ दरम्यान देखील अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे.
निष्काळजीपणा बेततोय जिवावर
वाहन चालविताना दुचाकीचालकांकडून निष्काळजीपणा केला जातो. तोच त्यांच्या जिवावर बेतत असल्याचे दिसून येते. हेल्मेटचा वापर न करणे, वाहनचालविताना फोनवर बोलणे, कानात हेडफोन घालून दुचाकी चालविणे, सिग्नल जम्पिंग करणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, भरधाव व बेदरकारपणे तसेच विरुध्द दिशेने दुचाकी चालविणे, गतिरोधकांकडे दुर्लक्ष करणे, अचानक ब्रेक दाबणे, स्टंट करणे, मद्यपान करून दुचाकी चालविणे यासह इतरही वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी अपघात होतात.
तळेगाव-शिक्रापूर व नाशिक फाटा ते चाकण मार्ग धोकादायक
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दुचाकीचे सर्वाधिक अपघात तळेगाव - चाकण - शिक्रापूर हा राज्यमार्ग तसेच पुणे - नाशिक महामार्गावर कासारवाडी (नाशिक फाटा) ते चाकण दरम्यान अपघाताचे प्रमाण जास्त आहे. या दोन्ही मार्गांवर एमआयडीसीतील अवजड वाहने तसेच कामगारांच्या दुचाकींची मोठी वर्दळ असते. बेदरकारपणे भरधाव वाहन चालविल्याने, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करताना तसेच हुलकावणी देणे किंवा कट मारल्यामुळे देखील दुचाकीचे अपघात होतात. यात अनेक दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागला आहे.
वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा. सुरक्षित प्रवासासाठी खबरदारी घेतली पाहिजे. पालकांनी मुलांना दुचाकी देताना सुरक्षेच्या दृष्टीने काही सूचना देखील कराव्यात. जेणेकरून त्यांच्याकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होणार नाही.
- श्रीकांत डिसले, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड
दुचाकींचे अपघात
महिना अपघात जखमी मृत्यू
जानेवारी ४६ २९ १७
फेब्रुवारी ३७ २६ ११
मार्च ३७ २८ ९
एप्रिल ६ २ ४
मे १९ ११ ८
जून ३० २० १०
जुलै २३ ११ १२
ऑगस्ट २६ १२ १४
सप्टेंबर ३१ १७ १४
ऑक्टोबर २७ १५ १२
नोव्हेंबर ४३ २५ १८