विनापरवाना भारतात वास्तव्य करणाऱ्या उझबेकिस्तानच्या महिलेचा मृत्यू; महिलेकडून करून घेतला वेश्या व्यवसाय
By नारायण बडगुजर | Published: August 23, 2023 08:35 PM2023-08-23T20:35:00+5:302023-08-23T20:35:02+5:30
आरोपींनी तिला बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड बनवून दिले, तसेच तिला पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करून घेतला
पिंपरी : विनापरवाना भारतात वास्तव्य करत असलेल्या उझबेकिस्तान येथील ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. २२) गुन्हा दाखल करून दोन जणांना अटक केली.
मुकेश बक्षोमल केसवानी (वय ४१, रा. रिव्हर रोड, पिंपरी), कृष्णा प्रकाश नायर (वय ३८, रा. चऱ्होली बुद्रुक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह मूळ वास्तव्य उझबेकिस्तान येथील असणाऱ्या ३९ वर्षीय महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उझबेकिस्तान येथील ३९ वर्षीय महिला विनापरवाना भारतात वास्तव्यासाठी आली. आरोपींनी तिला बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड बनवून दिले. तसेच तिला पैशांचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला. याप्रकरणी पुणे येथील चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान, ३९ वर्षीय महिला मुकेश केसवानी याला भेटण्यासाठी २९ जुलै २०२३ रोजी पिंपरी-चिंचवड शहरात आली. मोरवाडी येथील एका हॉटेलमध्ये ती थांबली होती. दरम्यान तिची तब्येत बिघडल्याने शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान १८ ऑगस्ट रोजी महिलेचा मृत्यू झाला. त्याबाबत पिंपरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्याचा तपास करत असताना ती महिला मूळची उझबेकिस्तान येथील असून ती बेकायदेशीरपणे भारतात वास्तव्य करीत असल्याचे समोर आले. तिला भारतात राहण्यासाठी आरोपी मुकेश आणि कृष्णा यांनी बनावट आधारकार्ड आणि पॅन कार्ड बनवले, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक अनिरुद्ध सावर्डे तपास करीत आहेत.
मायदेशी पाठवणार मृतदेह
मृत महिलेचे शवविच्छेदन करून व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. तसेच याबाबत महिलेच्या उझबेकिस्तान येथील नातेवाईकांना माहिती देण्यात आली. महिलेचा मृतदेह तिच्या मायदेशी उझबेकिस्तान येथे पाठवण्यात येणार आहे.