हृदयाभोवती पाणी झाल्याने 'त्या' संशयित चोराचा मृत्यू; शवविच्छेदन अहवालात स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 04:12 PM2020-08-19T16:12:04+5:302020-08-19T16:12:49+5:30
नशेच्या धुंदीत घरात घुसलेल्या चोराला नागरिकांनी बांधून ठेवलेले असताना त्याचा मृत्यू झाला होता
पिंपरी : घरात चोरी करण्यासाठी चोर आला असल्याच्या संशयावरून नागरिकांनी एकाला बांधून ठेवले. त्यामुळे घाबरल्याने त्याच्या हृदयाभोवती पाणी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. भोसरी येथे फुगे माने तालीम जवळ मंगळवारी (दि. १८) पहाटे सव्वापाचच्या सुमारास ही घटना घडली.
नारायण विठोबा फुगे (वय ६०), गणेश विठोबा फुगे (वय ३२), कुणाल विठोबा फुगे (वय २८, सर्व रा. फुगे माने तालीम जवळ, भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. १८) फिर्याद दिली. शंकर महादेव हौसे (वय ३६, रा. समर्थनगर, दिघी. मूळ रा. चिंचोली, ता. केज, जि. बीड) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास शंकर हौसे हा आरोपी यांच्या घरात आला. आरोपी यांनी त्याला चोर समजून त्याला खोलीत पकडून ठेवले आणि तो पळून जाऊ नये म्हणून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून बांधून ठेवले.
घाबरलेला संशयित चोर बांधून ठेवलेल्या अवस्थेत बेशुद्ध पडला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. शवविच्छेदन झाल्यानंतर मृत्यूचे कारण समोर आले. शंकर याच्या हृदयाभोवती पाणी झाले. त्याचा दाब पडल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद केले आहे. यावरून तीन जणांवर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.
नारायण विठोबा फुगे (वय ६०) यांनी याच्या परस्पर विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शंकर महादेव हौसे (वय ३६) याच्या विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. फुगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास आरोपी शंकर हौसे हा फिर्यादी यांच्या घराच्या भिंतीवरून उडी मारून दरवाजा उघडून चोरी करण्याच्या उद्देशाने घरात आला.
आरोपी हौसे याने घरातील साहित्याची आदळआपट करून नुकसान करून चोरी करण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्याला बांधून ठेवले. त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.