पवना धरण परिसर बनतोय पर्यटकांसाठी मृत्यूचा सापळा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 01:19 PM2019-04-26T13:19:34+5:302019-04-26T13:24:58+5:30
पवनमावळ हा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने नावारूपाला येत असून, या ठिकाणी सुटीच्या दिवशी, तसेच शनिवारी व रविवारी मोठ्या प्रमाणावर पर्यटक राज्य व परराज्यांतून येत असतात.
पवनानगर : पवन मावळ हा परिसर पुणे-मुंबई शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने, तसेच या ठिकाणाहून थंड हवेची अनेक ठिकाणे जवळ असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत आहेत. परंतु, परिसरातील पवना धरण हे मुत्यूचा सापळा ठरताना दिसत आहे. या ठिकाणी सुरक्षिततेचा अभाव आहे. उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
पवन मावळ हा परिसर शहराच्या हाकेच्या अंतरावर आहे. परिसरात अनेक औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने या ठिकाणी काम करणाऱ्या तरुण-तरुणी व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर सुटीच्या दिवशी पवन, मावळ परिसरातील पवना धरण, किल्ले लोहगड, विसापूर, तुंग, तिकोणा, बेडसे लेणी या भागात फिरण्यासाठी येत असतात. परिसरात मोठ्या प्रमाणावर छोटे-मोठे हॉटेल व्यवसाय आहेत. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना राहण्याची व जेवणाची उत्तम सोय केली जात असते. परंतु पोलीस व पवना धरण पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे या ठिकाणी येणाऱ्यापर्यटकांना जीव मुठीत धरून आनंद साजरा करावा लागत असतो. पवना धरण परिसराचा परिसर मोठा असल्याने काही ठिकाणी तारेचे कंपाउंड, तर काही ठिकाणी मोकळे असल्याने पर्यटक भिजण्याचा आनंद घेण्यासाठी जलाशयात उतरत असतो. परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सूचनाफलक नाहीत वा तोंडी सूचना दिल्या जात नाहीत. त्याचबरोबर एप्रिलच्या दिवसांत धरणाच्या पाण्यात बुडून तीन जणांच्या मृत्यूची नोंद लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. ते सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी व आयटी क्षेत्रात काम करणारे तरुण आहेत.
......
पवनमावळ हा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने नावारूपाला येत असून, या ठिकाणी सुटीच्या दिवशी, तसेच शनिवारी व रविवारी मोठ्या प्रमाणावर पर्यटक राज्य व परराज्यांतून येत असतात. परंतु अशा प्रकारे काही घटना घडल्यास पर्यटक नाराज होताना दिसतात. धरण परिसरात प्रेक्षणीय ठिकाणी सूचना फलक लावण्यात यावेत. पाटबंधारे विभागाकडे पुरेसा कर्मचारी वर्ग आहे. कर्मचाऱ्यांना प्रेक्षणीय स्थळावर नेमणूक करून त्या ठिकाणी सूचना देण्यासाठी थांबविण्यात यावे. पोलिसांनी यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करावी. धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर हॉटेल व्यवसाय असून, या ठिकाणी बेकायदा दारू विक्री केली जात आहे. याकडे राज्य उत्पादनशुल्क विभागाचे व पोलिसांचे सर्रासपणे दुर्लक्ष होत आहे. त्यावर पवना धरण परिसरातील हॉटेलमध्ये मिळणारी बेकायदा दारू विक्री बंद करावी.
........
.पाटबंधारे विभागाच्या वतीने धरण क्षेत्रात सूचनाफलक लावण्यात यावेत. पाटबंधारे विभागाकडे पुरेसा कर्मचारी वर्ग असून, त्याचा कोणत्याही प्रकारचा उपयोग होताना दिसत नाही. यावर पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून पवना धरण परिसरात सूचनाफलक व धरण क्षेत्रातील वर्दळीच्या ठिकाणी एका कर्मचाºयाची नेमणूक करण्यात यावी. तसेच पोलिसांनीही बंदोबस्त ठेवावा. - नारायण बोडके, सरपंच, गेव्हडे खडक, ठाकुरसाई ग्रामपंचायत
..........
पवना धरण परिसरात सूचनाफलक लावले असून, ज्या ठिकाणी सूचनाफलक नाही त्या ठिकाणी लवकरच सूचनाफलक लावले जातील व पाटबंधारे विभागाच्या कर्मचाºयांना पर्यटकांना पाण्यात जाऊ नये यासाठी सूचना देण्यात याव्यात, अशा सूचना केल्या आहेत. - ए. आर. शेटे, उपअभियंता, पाटबंधारे विभाग