महापौरांविरोधात घोषणाबाजी
By admin | Published: April 12, 2017 04:10 AM2017-04-12T04:10:33+5:302017-04-12T04:10:33+5:30
क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्त महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे अनुपस्थित राहिल्यामुळे संघर्ष समितीच्या वतीने निषेधाच्या
पिंपरी : क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्त महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे अनुपस्थित राहिल्यामुळे संघर्ष समितीच्या वतीने निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. ‘रायगडावर महाराष्ट्रातील महापौर, उपमहापौरांचा कार्यक्रम असल्याने महापौर उपस्थित राहू शकले नाहीत, अन्य पदाधिकारी उपस्थित होते, असे पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित कार्यक्रमास ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रताप गुरव यांच्या हस्ते पिंपरीतील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. या कार्यक्रमास महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे अनुपस्थित राहिल्यामुळे संघर्ष समितीच्या वतीने निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. मनपाच्या वतीने पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पुष्पहार अर्पण केला. परंतु महापौर व उपमहापौरांनी महात्मा फुले जयंतीस अनुपस्थित राहून या महापुरुषांचा अवमान केला आहे. महापौर आणि उपमहापौरांनी या चुकीबाबत जाहीर माफी मागावी. पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिलगीरी व्यक्त केली असली तरी महापौर व उपमहापौरांनी ओबीसी समाजाचा व फुले, शाहू, आंबेडकर या महापुरुषांचा आदर राखावा अशी मागणी माळी महासंघाचे अध्यक्ष आनंदा कुदळे, ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रताप गुरव यांनी केली आहे.
यावेळी माजी महापौर, नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, नगरसेवक संतोष लोंढे, नगरसेविका सुलक्षणा धर, माधवी राजापुरे, आशा शेंडगे, कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा व शिक्षण मंडळाच्या माजी सभापती गिरीजा कुदळे, पी.के महाजन, प्रविण कुदळे, नेहुल कुदळे, ईश्वर कुदळे, हनुमंत माळी, महात्मा फुले ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष निवृत्ती गायकवाड आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
- याबाबत बोलताना पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘रायगडावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होता. त्यास राज्यातील सर्व महापालिकांचे नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर उपस्थित राहणार होते. त्यामुळे आपले पदाधिकारी कार्यक्रमास गेले होते. मात्र, पक्षनेते आणि स्थायी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. पिंपरीत महोत्सवाचे कार्यक्रम दिवसभर सुरू आहेत. त्यामुळे दिवसभरात होणाऱ्या कार्यक्रमास महापौर उपस्थित राहणार आहेत.’’