शास्तीकर माफीची घोषणा विरली हवेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 01:54 AM2019-01-26T01:54:35+5:302019-01-26T01:54:52+5:30
चिंचवड येथील कार्यक्रमात ‘शास्तीची धास्ती पंधरा दिवसांत घालवू’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.
पिंपरी : चिंचवड येथील कार्यक्रमात ‘शास्तीची धास्ती पंधरा दिवसांत घालवू’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यास पंधरा दिवस उलटून गेले असून, अद्याप शास्तीकर माफीबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याने मुख्यमंत्र्यांचे आश्वासन हवेतच विरल्याचे दिसून येत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजना, स्मार्ट सिटीतील कामांचे ई-भूमिपूजन चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ९ जानेवारीला झाले. त्या वेळी झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील अनधिकृत बांधकामाची शास्ती १५ दिवसांत माफ करू, असे आश्वासन दिले होते. कॅबिनेटमध्ये चर्चा करून १५ दिवसांत निर्णय घेतला जाईल. नागरिकांना दिलासा दिला जाईल, असेही नमूद केले होते.
दरम्यान, अनधिकृत बांधकामांना शास्तीकर लागून येत असल्याने नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसतो. यातून मुक्तता झाल्यास दिलासा मिळेल, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेमुळे शहरातील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या. घोषणेप्रमाणे पंधरा दिवसांत काही तरी निर्णय होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, शास्तीकर माफीच्या कसल्याही हालचाली झाल्याच्या दिसून येत नाही.
>‘काउंटडाउन’ आंदोलनानंतरही नाही कार्यवाही
चिंचवड येथील कार्यक्रमात ‘शास्तीची धास्ती १५ दिवसांत घालवू’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानंतर विरोधकांनी शास्तीमाफीचा फलक पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोर लावून ‘काउंटडाउन’ आंदोलन केले. विरोधी पक्षांनी १२ जानेवारीपासून ‘काउंटडाउन’ सुरू केले होते. ‘पिंपरी-चिंचवड शहरवासीयांनो, शास्तीकर माफ होतोय. दिवस राहिले —!’ असा फलकावर उल्लेख करण्यात आला.
>मुख्यमंत्री आश्वासन : नागरिकांमध्ये नाराजी
पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासह शास्तीकर माफीबाबत यापूर्वीही मंत्र्यांसह इतरही राजकीय नेत्यांकडूनही अनेकदा घोषणा झाल्या आहेत. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणी झालीच नसल्याने नागरिकांची निराशा झाली. दरम्यान, खुद्द मुख्यमंत्र्यांनी शास्तीमाफीची घोषणा केल्याने आता तरी हा प्रश्न मार्गी लागेल, अशी आशा शहरवासीयांना होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या घोषणेस १५ दिवस उलटल्याने मुख्यमंत्र्यांची घोषणाही केवळ तात्पुरतीच होती काय, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.