उद्योगनगरीत मनी ट्रान्स्फरच्या प्रमाणात घट, इंटरनेट बँकिंगच्या वापरात होतेय वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 05:17 AM2018-02-18T05:17:04+5:302018-02-18T05:20:43+5:30
शहरात विविध ठिकाणी मोबाइल विक्री, दुरुस्ती दुकानांमध्ये आठवड्यातून एकदा शनिवारी अथवा रविवारी परराज्यात नातेवाइकांना पैसे पाठविण्यासाठी बँकांपेक्षा मनी ट्रान्स्फर केंद्रात मोठ्या रांगा दिसून येत असत.
पिंपरी : शहरात विविध ठिकाणी मोबाइल विक्री, दुरुस्ती दुकानांमध्ये आठवड्यातून एकदा शनिवारी अथवा रविवारी परराज्यात नातेवाइकांना पैसे पाठविण्यासाठी बँकांपेक्षा मनी ट्रान्स्फर केंद्रात मोठ्या रांगा दिसून येत असत. नोटा बंदीनंतर अशा रांगा कमी झाल्या आहेत. आता एखादी दुसरी व्यक्ती अशा केंद्रावर पैसे भरण्यासाठी आल्याचे दिसून येते.
बांधकामावर काम करणारे मजूर, तसेच रोजंदारीवर काम करणारे असंघटित कामगार अशा केंद्रात जाऊन नातेवाइकांना पैसे पाठवितात. पोस्ट अथवा बँकेमार्फत पैसे पाठविणे वेळखाऊ ठरते. तातडीने रक्कम पोहोचत नाही.
बनावट नोटा, बदलून त्या परप्रातांत पाठविण्यासाठी मनी ट्रान्स्फर केंद्रांचा वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार शहरात निदर्शनास आला होता. बांग्लादेशाच्या सिमेवरून आणल्या जणाºया बनावट नोटा भारतीय चलनात वापरात आणून अर्थव्यवस्थेला बाधा पोहोचविण्याचा प्रकार केला जात होता. पिंपरी पोलिसांनी अशा संशयित परप्रांतीयांना बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यातील काहींनी कबुली दिली होती. पिंपरीतील झोपडपट्टीत राहणाºया परप्रांतीयांच्या घरात अशी बनावट नोटांची बंडले आढळून आली होती. नोटाबंदीनंतर बनावट नोटांचा चलनात आणणाºयांना अडचणी आल्या. परिणामी मनी ट्रान्सफर केंद्रातील गर्दी कमी झाल्याचे जाणवू लागले आहे.
मनी ट्रान्स्फर केंद्राद्वारे जलद स्वरूपात पैसे पाठविणे शक्य होते. मनी ट्रान्स्फर केंद्रातून रक्कम पाठविण्यासाठी विशिष्ट शुल्क आकारले जाते. विविध बँकांची मोबाइल अॅप्स असून प्रत्येक बँकेचे सेवा शुल्क वेगवेगळे आहे. मात्र कष्टकरी या अशिक्षित कामगार वर्गास अशा अॅपचा वापर करता येत नाही. त्यामुळे ते मनी ट्रान्स्फर केंद्रातच जाणे पसंत करतात. तेथील व्यक्तीच्या मदतीने रक्कम हस्तांतरित केले जाते. दोन महिन्यांपासून मनी ट्रान्स्फर केंद्रातील गर्दी कमी झाली आहे.