फेक अकाउंट तयार करून विवाहितेची बदनामी; ‘त्या’ काॅलमुळे उघडकीस आला प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 06:37 PM2022-05-11T18:37:14+5:302022-05-11T18:37:23+5:30
महिलेचे फोटो वापरून व्हिडिओ तयार करून महिलेचा फोन क्रमांक देखील व्हायरल केला
पिंपरी : गृहिणी असलेल्या विवाहित महिलेच्या नावाने सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार केले. तसेच महिलेचे फोटो वापरून व्हिडिओ तयार करून महिलेचा फोन क्रमांक देखील व्हायरल केला. त्या क्रमांकावरून महिलेला फोन आला आणि हा प्रकार उघडकीस आला. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ एप्रिल ते १० मे २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला.
याप्रकरणी पीडित महिलेने मंगळवारी (दि. १०) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला विवाहित असून, गृहिणी आहे. अज्ञात व्यक्तीने फिर्यादी महिलेच्या नावाने इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट बनवले. त्यावर फिर्यादी महिलेचे फोटो वापरून व्हिडिओ तयार केला. तसेच त्यावर महिलेचा फोन क्रमांक देखील व्हायरल केला. महिलेला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. तुमचा नंबर इन्स्टाग्रामच्या अकाउंटवर आहे म्हणून तुम्हाला फोन केला, असे फोन करणाऱ्या संबंधित व्यक्तीने सांगितले. त्यामुळे महिलेच्या नावाने इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला. महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विराेधात गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक (गुन्हे) सोन्याबापू देशमुख तपास करीत आहेत.