Pimpri Chinchwad: पराभव झाला, पण म्हणून आपण संपलेलो नाही; आता तयारी महापालिकेची - राहुल कलाटे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2024 01:22 PM2024-12-08T13:22:36+5:302024-12-08T13:23:24+5:30
भविष्यातील शहराच्या विकासासाठी, जनसामान्यांना न्याय देण्यासाठी आता आपल्याला पूर्ण ताकदीने महापालिका निवडणूक लढायची आहे
पिंपरी : निवडणुकीत पराभव झाला, पण म्हणून आपण संपलेलो नाही. लाखाहून अधिक मतदारांनी आपल्यावर विश्वास ठेवला, हजारो कार्यकर्ते दिवसरात्र या निवडणुकी दरम्यान राबले. महाविकास आघाडी म्हणून आपण प्रामाणिकपणे एकत्र काम केले. भविष्यातील शहराच्या विकासासाठी, जनसामान्यांना न्याय देण्यासाठी आता आपल्याला पूर्ण ताकदीने महापालिका निवडणूक लढायची आहे. त्यासाठी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागू, अधिकाधिक नवीन आणि तरुण चेहऱ्यांना संधी देऊ, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते राहुल कलाटे यांनी वाकड येथे केले.
कलाटे म्हणाले, या निवडणुकीत सर्वच पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी एकजुटीने दिलेला लढा कौतुकास्पद आहे. आगामी काळात महापालिका निवडणुकीत याच ताकदीने, एकजुटीने काम करू. लोकहितासाठी नेटाने काम केल्यास या महापालिकेत सर्व तरुण चेहरे दिसतील. देशातील लोकशाही जिवंत ठेवायची असेल, पुढच्या पिढीचे भवितव्य सुरक्षित करायचे असेल तर चुकीच्या प्रवृत्तींविरोधात लढा उभारावा लागेल. विधानसभेला लाडकी बहीण, 'कटेंगे तो बटेंगे' असे नरेटिव्ह तयार करून सर्वसामान्य लोकांची दिशाभूल केली. शहराच्या मूलभूत प्रश्नापासून लक्ष हटवून वेगळ्याच मुद्द्यांवर ही निवडणूक झाली. या सर्व वाईट प्रवृत्तींविरोधात लढा उभारावा लागेल. शहरातील बिघडलेली व्यवस्था सुधारण्यासाठी चांगल्या विचारांची तरुण पिढी पुढे आणावी लागेल. तसा प्रयत्न महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी या निवडणुकीतही केला होता. मात्र, ईव्हीएमने घोटाळा केला. पोस्टल मतात महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार पुढे होते तरीही निवडणुकीचा निकाल मात्र पूर्णपणे एकतर्फी विरोधात आहे. त्यामुळे फेरमतमोजणी घेण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. ईव्हीएम विरोधात प्रखर लढा द्यायचा आहे.''