खरेदी खतामध्ये ठरवून दिलेले नियम न पाळता फ्लॅटधारकांची फसवणूक; बिल्डरवर गुन्हा दाखल
By नारायण बडगुजर | Published: January 15, 2024 08:22 PM2024-01-15T20:22:03+5:302024-01-15T20:22:30+5:30
ताथवडे येथील द लूक हाउसिंग सोसायटीत २ मार्च २०१६ ते १४ जानेवारी २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला
पिंपरी : खरेदी खतामध्ये ठरवून दिलेल्या नियम व अटीप्रमाणे अभिहस्तांतरण व सुविधा उपलब्ध करून न देता सदनिकाधारकांची फसवणूक केली. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. ताथवडे येथील द लूक हाउसिंग सोसायटीत २ मार्च २०१६ ते १४ जानेवारी २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला.
पिरॅमिड डेव्हलपर्सचे बिल्डर खेमचंद उत्तमचंद भोजवानी, पिरॅमिड डेव्हलपर्स यांचे भागीदार, प्रथमेश डेव्हलपर्स व त्यांचे भागीदार, तसेच गृहप्रकल्पाच्या जमिनीचे मालक यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दयानंद रवाळनाथ पाटील (३८, रा. ताथवडे) यांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेमचंद भोजवानी यांनी फिर्यादी दयानंद यांना फ्लॅट खरेदी देताना खरेदी खतामध्ये ठरवून दिलेल्या नियम व अटीप्रमाणे अभिहस्तांतरण व ॲमेनिटीज दिल्या नाहीत. भोजवानी यांनी ॲमेनिटीजमध्ये बँक्वेट हॉल, स्केटिंग रिंग, बॅडमिंटन कोर्ट बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी फिर्यादी दयानंद आणि इतर फ्लॅट धारकांकडून रक्कम स्वीकारली. मात्र फ्लॅटधारकांना बँक्वेट हॉल, स्केटिंग रिंग, बॅडमिंटन कोर्ट सोसायटीला दिलेले नाही.
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) मंजूर आराखड्यामध्ये नमूद केलेल्या जागी न बांधता वेगळ्याच ठिकाणी बांधलेला आहे. तसेच बांधकाम व्यावसायिकाने मेंटेनन्स चार्ज म्हणून प्रत्येक फ्लॅटधारकाकडून दोन वर्षांसाठी सुमारे ५० हजार रुपये प्रमाणे घेतले. त्यानंतर बांधकाम व्यावसायिकांनी सोसायटी फ्लॅटधारकांकडे हॅन्ड ओव्हर केली. फिर्यादी पाटील आणि इतर फ्लॅट धारकांकडून मेंटेनन्स चार्ज म्हणून घेतलेल्या रकमेचा कोणताही हिशेब दिला नाही. बांधकाम व्यवसायिकाने ॲग्रीमेंटमध्ये लिहून दिलेल्या तारखेला फ्लॅटचा ताबा दिलेला नाही. भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करून दिलेले नाही.
ॲग्रीमेंट करून देताना संपूर्ण इमारतीचा नकाशा जोडणे बंधनकारक असताना केवळ फ्लोअर प्लॅन जोडलेला असल्याने करार नोंदणी कायद्याप्रमाणे नोंदणी करून दिलेला नाही. फ्लॅट धारकांकडून घेतलेल्या आगाऊ रकमा बँकेत स्वतंत्र खाते उघडून त्यात ठेवलेल्या नसून त्याचा कोणताही हिशेब दिलेला नाही. सोसायटी नोंदणी झाल्यापासून चार महिन्यांत संपूर्ण जमीन व इमारती सोसायटीला हस्तांतरित केलेल्या नाहीत. कन्व्हेयन्स डिड करून दिलेली नाही. त्यामुळे बांधकाम व्यवसायिकाने फिर्यादी पाटील व द नुक हाऊसिंग सोसायटीमधील इतर फ्लॅट धारकांचा विश्वासघात करून फसवणूक केली. पोलिस निरीक्षक (गुन्हे) विठ्ठल साळुंखे तपास करीत आहेत.