देहूगाव - माळीनगरात अशुद्ध पाणी, प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 05:55 AM2018-03-12T05:55:56+5:302018-03-14T01:09:26+5:30
देहूगाव: येथील माळीनगर भागात गेल्या काही दिवसांपासून अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने येथील नागरिक संतप्त भावना व्यक्त करीत आहेत.
श्रीक्षेत्र देहूगावला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या देहूगावसाठी नवी पाणीपुरवठा योजना सुमारे नऊ कोटी रुपये खर्च करून तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून केली.
ही योजना तयार असून, ती कार्यान्वित करण्यासाठी तपासणीही झाली. मात्र त्यांनी ती योजना देहूगाव व विठ्ठलनगर भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी केली आहे. मात्र माळीनगरसाठी ही योजना कार्यान्वित केली नव्हती. त्यामुळे जुन्या योजनेतूनच पाणीपुरवठा केला जात आहे. या प्रकल्पातील शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणारी वाळूही खराब झाली होती. त्यामुळे काही भागात खराब व गढूळ आणि हिरवे, शेवाळमिश्रित पाणी येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने उपसरपंच संतोष हगवणे व ग्रामविकास अधिकारी यांनी तातडीने प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली.
यापूर्वी माजी सरपंच हेमा मोरे यांनीही भेट देऊन येथील कर्मचाºयांना पाणीपुरवठा शुद्ध व सुरळीत करण्यासंदर्भात काही सूचना
केल्या. तेव्हा त्यांना क्लोरिनेशन
काम योग्य रीतीने होत नसल्याचे आढळले होते. यात्रा काळात असे काही होणार नसल्याचे येथील असे शाखा अभियंता धनंजय जगधने यांनी सांगितले.
याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूषण भारती म्हणाल्या, ‘‘ग्रामपंचायत व महाराष्ट्र
जीवन प्राधिकरण विभाग यांना जानेवारी, फेब्रुवारी व मार्चमध्येही लेखी कळविले आहे. मात्र
तरीही दखल घेतली नाही. त्यामुळे पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले आहेत.’’
माळीनगर भागात तातडीने शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी येथील महिला कार्यकर्त्या वैशाली टिळेकर यांनी केली आहे.
साथीचे आजार : दक्षता घेण्याचे आवाहन
१गेल्या दोन दिवसांत अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने काविळीची
शक्यता नाकारता येत नाही. काविळीचे जंतू हे आठ दिवस
सुप्तावस्थेत राहू शकतात. याबाबत आणखी दोन-तीन दिवसांनी निश्चित काय ते समजू येईल. मात्र लोकांनी पाणी उकळून व मेडीक्लोरचा वापर करून शुद्ध करून वापरावे. याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
२शाखा अभियंता धनंजय जगधने म्हणाले की, नवीन योजनेची तपासणी सुरू असून, जुन्या योजनेतील वाळू खराब झालेली होती. त्यामुळे काही वेळा गढूळ व हिरव्या पाण्याचा पुरवठा झाला होता. आता मात्र माळीनगरलाही नवीन योजनेतून पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्या दृष्टीने आज चाचणी करून शुद्ध पाणीपुरवठा केला आहे. त्याचे नमुने तपासूनदेखील घेतलेले असल्याने हा प्रश्न सोडविण्यात यश आले आहे.