देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड : स्वच्छता अभियानासाठी उभारला महागडा मंडप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 02:27 AM2018-09-26T02:27:43+5:302018-09-26T02:28:58+5:30
गेल्या महिन्यात कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सीईओंनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विकासकामे करण्यासाठी बोर्डाकडे पैसे नसल्याचे जाहीर केले होते.
देहूरोड - गेल्या महिन्यात कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सीईओंनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विकासकामे करण्यासाठी बोर्डाकडे पैसे नसल्याचे जाहीर केले होते. याला अवघे तीन आठवडे उलटले असताना शनिवारी झालेल्या स्वच्छता अभियानाच्या उद्घाटनालाही आलिशान महागडा मंडप टाकण्यात आला होता. ‘होऊ द्या खर्च पद्धती’ अंगलट येऊनही पुन्हा नव्या जोमाने खर्च करण्यात येत असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
स्वच्छ भारत अभियानाच्या चौथ्या वर्धानपदिनानिमित्त ‘स्वच्छता ही सेवा’ हा संदेश देत स्वच्छतेसाठी जनआंदोलन गतिमान करण्यासाठी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने गांधी जयंतीपर्यंत चालणाऱ्या स्वच्छता अभियानाचा शुभारंभ आमदार बाळा भेगडे यांच्या हस्ते करण्यात आला़ त्या वेळी ते बोलत होते. या वेळी बोर्ड उपाध्यक्षा सारिका नाईकनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सानप, बोर्ड सदस्य रघुवीर शेलार, विशाल खंडेलवाल, ललित बालघरे, लष्करी मुख्यालयाचे कर्नल विवेक कोचर, कर्नल पाटील, डॉ़ त्रिंबक वाकचौरे यांच्यासह देहूरोड राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अॅड़ कृष्णा दाभोळे, भाजपचे शहराध्यक्ष अॅड़ कैलास पानसरे, नंदकुमार पिंजण, तुकाराम जाधव, मेहरबानसिंग आदी नागरिक, बोर्डाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सीईओ सानप यांनी उपस्थित सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली. आमदार भेगडे, सीईओ सानप, उपाध्यक्ष नाईकनवरे, शेलार यांनी मनोगत व्यक्त केले.
स्वच्छता राखणे ही केवळ कॅन्टोन्मेंट बोर्डाची जबाबदारी नसून, सर्वांची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर भर द्यावा, स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी, सर्वांनी अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन मावळचे आमदार संजय भेगडे यांनी देहूरोड येथे केले.
सीईओ सानप यांनी
प्रास्तविक केले. सुनील गुरव यांनी सूत्रसंचालन केले. आरोग्य निरीक्षक किरण गोंटे यांनी आभार मानले. कार्यालय अधीक्षक श्रीरंग सावंत, सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी संयोजन केले .
देहूरोड परिसरात रॅली
स्वच्छ भारत अभियानाचा चौथ्या वर्धापन दिनानिमित्त स्वच्छतेसाठी जनजागृती कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शाळांतील विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, डॉक्टर, रुग्णालय कर्मचारी, बोर्डातील सर्व अधिकारी, पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व बोर्ड कर्मचाºयांसह बोर्ड कार्यालयापासून देहूरोड परिसरात रॅली काढण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या हातात स्वच्छतेचे संदेश देणारे फलक झळकत होते. स्वच्छता अभियानाची सुरुवात गेल्या वर्षी लोकप्रतिनिधींनी हातात झाडू घेऊन केली होती. मात्र या वर्षी तसे घडले नाही.
गेल्या वर्षी कॅन्टोन्मेंट बोर्डाने राबविलेल्या स्वच्छता अभियानाच्या उद्घाटनाच्या वेळी उभारलेल्या मंडपासाठी चक्क ६३ हजार ६२५ व सांगता सोहळ्यासाठी ५९ हजार ८५० रुपयांचा मंडप उभारण्यात आलेला होता. तसेच अभियानात गौरवचिन्ह, प्रमाणपत्रे, पदके यांवर ४५ हजार ९०० रुपये, तसेच अभियानासाठी छापलेल्या फ्लेक्ससाठी १ लाख ७१ हजार १४७ रुपये खर्च केल्याची माहिती उपलब्ध झाली.