देहूरोड : कंटेनर अडकल्याने झाली वाहतूककोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 01:16 AM2018-12-27T01:16:15+5:302018-12-27T01:16:50+5:30
पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी दुपारी सव्वाच्या सुमारास बँक आॅफ इंडिया चौकात एलिव्हेटेड रस्ता व उड्डाणपुलाचे काम सुरू असलेल्या पहिल्या पिलरला कंटेनर धडला.
देहूरोड : पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी दुपारी सव्वाच्या सुमारास बँक आॅफ इंडिया चौकात एलिव्हेटेड रस्ता व उड्डाणपुलाचे काम सुरू असलेल्या पहिल्या पिलरला कंटेनर धडला. कंटेनर अडकल्याने वाहनचालकांची व स्थानिक ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली. पुलाच्या सिमेंट पिलरला वारंवार कंटेनर अडकत असतानाही रस्ते विकास महामंडळाच्या ठेकेदाराकडून उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने, असे प्रकार घडत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे.
बुधवारी दुपारी पुण्याकडून मुंबईच्या दिशेने निघालेला मालवाहू कंटेनर देहूरोड बाजार भागातील एलिव्हेटेड रस्ता व उड्डाणपुलाचे काम सुरू असलेल्या भागातील सेवा रस्त्यावरून जात होता. एलिव्हेटेड व उड्डाणपुलाला जोडणाऱ्या रस्त्यासाठी बांधण्यात येत असलेल्या चौकात पहिल्या सिमेंट पिलरला धडकून अडकला. कंटेनर अडकल्याने जोरात आवाज झाला.
त्याठिकाणी नागरिकांनी धाव घेतली. तोपर्यंत अर्ध्याहून अधिक कंटेनर पुलाच्या सिमेंट पिलरला
घासून पुढे जाऊन अडकून पडला होता.
वाहनचालकांना मारावा लागला वळसा
कंटेनर अडकल्याने मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक ठप्प झाली होती. कंटेनरच्या मागील उजव्या बाजूच्या सर्व चाकांची हवा कमी करून हळू-हळू पिलरला घासत चालकाने कंटेनर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; मात्र कंटेनर निघाला नाही. तोपर्यंत पुणे बाजूकडे वाहनांची मोठी रांग लागली होती. काही वाहने विरुद्ध दिशेने जाऊ लागल्याने वाहतूककोंडी झाली होती. इतर सर्व रस्त्यांवर वाहने जाऊ लागल्याने सर्वत्र वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे मुंबईकडे जाणाºया वाहनचालकांना व स्थानिकांना सोमाटणे, तळेगावकडे जाण्यासाठी मोठा वळसा घालून जावे लागत होते. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते मेहरबानसिंग तक्की यांनी देहूरोड वाहतूक पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश पवार यांना कळविल्यानंतर दोन वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला़ मात्र तोपर्यंत लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर पोलिसांनी संबंधित पुलाचे काम करणाºया ठेकेदाराची क्रेन आणून अडकलेला कंटेनर एक तासाने काढण्यात यश आले. गेल्या पाच महिन्यांत येथील महामार्गावर स्वामी विवेकानंद चौकात व बँक आॅफ इंडिया चौकात अशा पद्धतीने उड्डाणपुलाच्या पिलरला कंटेनर अडकण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. मात्र पुलाचे काम करणाºया ठेकेदाराकडून याबाबत काहीही उपाययोजना केली नसल्याचे उघड झाले असून, राज्य रस्ते विकास महामंडळाने संबंधित उड्डाणपूल व एलिव्हेटेड रस्त्याचे काम करणाºया ठेकेदारास तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करणेबाबत सूचना द्याव्यात, अशी मागणी वाहनचालकांनी व स्थानिकांनी केली आहे.