देहूरोडला दोन्ही भुयारी मार्ग वापराविना पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 12:49 AM2019-01-08T00:49:21+5:302019-01-08T00:49:49+5:30
पुणे-मुंबई महामार्ग : सेवा रस्त्यासाठी संरक्षण विभागाकडून जागा मिळेना
देहूरोड : पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर देहूरोड ते निगडी दरम्यान नागरिकांच्या सोईसाठी विविध तीन ठिकाणी प्रस्तावित असणाऱ्या तीन भुयारी मार्गांपैकी देहूरोड येथील आयुध निर्माणी, तसेच केंद्रीय विद्यालय येथील दोन भुयारी मार्गांचे बांधकाम सुमारे पाच महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात आलेले आहे. मात्र रस्तेविकास महामंडळामार्फत दोन्ही ठिकाणी बांधण्यात आलेल्या भुयारी मार्गास जोडणाºया सेवा रस्त्यासाठी हवी असणारी जागा संरक्षण विभागाकडून उपलब्ध झाली नसल्याने भुयारी मार्गांचा वापर आयुध निर्माणीतील कामगार, वसाहतीत राहणारे नागरिक, विद्यार्थी, तसेच हलक्या मोटारी, रिक्षा व दुचाकी यांना करता येत नाही. परिणामी सर्वांना जीव धोक्यात घालून दररोज महामार्गावरून ये-जा करावी लागत आहे.
पुणे-मुंबई महामार्गाचे देहूरोड ते निगडी दरम्यानच्या रस्त्याचे चौपदरीकरण करताना रस्ते विकास महामंडळाने स्थानिक नागरिक, वाहनचालक यांच्या सुरक्षेसाठी व महामार्गावर वाहतूक सुरळीत राहावी म्हणून देहूरोड परिसरात तीन ठिकाणी मोटारी, रिक्षा व दुचाकी तसेच पादचारी यांना ये-जा करण्यासाठी आयुध निर्माणी, केंद्रीय विद्यालय क्रमांक एक व देहू दारूगोळा कोठाराजवळ (एफएडी - बी सब डेपो) अशा तीन ठिकाणी भुयारी मार्ग बांधण्याचे निश्चित झाले होते. त्यांपैकी आयुध निर्माणी प्रवेशद्वार व केंद्रीय विद्यालयाजवळ तीन-तीन मीटर रुंदीचे दोन भुयारी मार्ग बांधकाम पाच महिन्यांपूर्वी पूर्ण झाले आहे, तर दारुगोळा कोठाराजवळ बांधण्यात येणाºया भुयारी मार्गाची जागा बदलण्यात आली असून, नवीन ठिकाण अद्याप निश्चित झाले नसल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान, देहूरोड येथील संरक्षण विभागाच्या आयुध निर्माणी व केंद्रीय विद्यालयाजवळ बांधण्यात आलेल्या दोन्ही भुयारी मार्गांना व महामार्गाला जोडणाºया सेवा रस्त्यासाठी रस्ते विकास महामंडळाने केंद्रीय संरक्षण विभागाकडे जागेची मागणी केली आहे. मात्र संबंधित विभागाने जागेच्या मोबदल्यापोटी २४ कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी केली असल्याचे रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाºयांनी स्पष्ट केले आहे. मात्र, रस्ते विकास महामंडळानेही याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. परिणामी दोन्ही भुयारी मार्ग बांधून तयार आहेत. मात्र समन्वयाच्या अभावाने स्थानिक वाहनचालक , कामगार, नागरिक व विद्यार्थी यांना दररोज जीव धोक्यात घालून महामार्गावरूनच ये-जा करावी लागत असून, सेवा रस्त्याची सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करावी, अशी मागणी होत आहे.
महामार्ग चौपदरीकरण करताना देहूरोड परिसरातील नागरीकरण व विविध लष्करी आस्थापना यांचा विचार करून सर्वांच्या सहमतीने आयुध निर्माणी व केंद्रीय विद्यालय येथे भुयारी मार्ग बांधण्यात आले असून फक्त सेवा रस्त्याचे काम रखडलेले आहे. मात्र सेवा रस्ता बांधकामासाठी हवी असणारी लगतची जागा ही संरक्षण विभागाची असून त्यांच्याकडे रितसर जागा मागणीचा प्रस्ताव दिलेला आहे. मात्र त्यांच्याकडून दोन्ही ठिकाणच्या जागेच्या मोबदल्यापोटी २४ कोटी रुपयांची मागणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे सेवा रस्त्याचे काम रखडले आहे. याबाबत पदाधिकाºयांना अहवाल देण्यात आलेला आहे. अंतिम निर्णय झाल्यानंतर सेवा रस्त्याचे काम मार्गी लागू शकते.
- संजय गांगुर्डे, कार्यकारी अभियंता, रस्ते विकास महामंडळ