वीज बिल न भरल्याने देहूगावचा पाणी पुरवठा बंद; २८ लाख रुपये महावितरणची थकबाकी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 05:08 PM2021-03-18T17:08:16+5:302021-03-18T17:08:46+5:30
ऐन उन्हाळ्यात विद्यूत पुरवठा खंत केल्याने पाणी पुरवठा बंद झाला असल्याने देहूकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे
देहूगाव : इंद्रायणी नदीत मुबलक पाणी असताना देहूगावच्या नळ पाणी पुरवठा योजनेचे 28 लाख 55 हजार 99 रुपये वीज बिल थकल्याने महावितरणने नळपाणी पुरवठा योजनेसह, मैला शुध्दीकरण प्रकल्पाचा देखील विद्युत पुरवठा खंडित केल्याने देहूकरांचा गेल्या दोन दिवसांपासुन पाणी पुरवठा बंद आहे.
ऐन उन्हाळ्यात विद्यूत पुरवठा खंत केल्याने पाणी पुरवठा बंद झाला असल्याने देहूकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. नियमित पाणी बिल भरणाऱ्या सर्वसामान्य नळजोड धारक ग्राहकांना त्याचा चांगलाच फटका बसत आहे. देहूगाव ग्रामपंचायतीचे 8 नोव्हेंबर 2020 मध्ये नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाले. यावेळी ग्रामपंचायतीकडे नळपाणी पुरवठा विभागाचे सुमारे 34 लाख रुपये थकले होते.
ग्रामपंचायतीचे रुपांतर होताना अनेक देणी थकीत होती. जो निधी अथवा रक्कम शिल्लक होती ती रक्कम विविध देणीदारांची देणी चुकती करण्यात खर्ची झाली होती. तर काही देणी नंतर देण्यात आली. त्यातच कोरोना चा प्रभाव वाढल्याने गावची घरपट्टी व पाणी पट्टी वसुली थकलेली आहे. कोरोनामुळेच शासनाकडून देखील निधी उपलब्धतेबाबत अडचणी येत असल्याने नगरपंचायतीचा खर्च कसा भागवावा हा देखील प्रशासकांच्या पुढे यक्षप्रश्न आहे.
एकंदरीत नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतीकडे वीज बिल भरण्यासाठी शिल्लक रक्कम नव्हती. त्यामुळे एक महिन्यापुर्वीच महावितरणकडून याबाबत वीजजोड तोडण्याची कारवाई करण्यात येणार होती. परंतू खासदार श्रीरंग बारणे यांच्या शिष्टाईमुळे ती कारवाई थांबली होती व सहा महिन्यात टप्प्या टप्प्याने नगरपंचायत ही बिले भरेल असे सांगितले होते. नगरपंचायत रक्कम भरणे अपेक्षित होते. परंतू प्रशासनाने कडून ही रक्कम भरली न गेल्याने महावितरणने कारवाई करत बुधवारी सकाळी 11 वाजता बोडकेवाडी येथील नळ पाणी पुरवठा योजनेचा विद्यूत पुरवठा खंडित केला आहे.
याबाबत महावितरणचे शाखा अभियंता अनिल मुरदडगौंडा यांनी सांगितले, नगरपंचायतकडे अद्यापही 28 लाख 55 हजार 99 रुपये थकीत आहे. या महिन्यात नगरपंचायतीने काही रक्कम भरणे अपेक्षित होते, परंतू त्यांनी ती रक्क्म भरली नसल्याने विद्यूत पुरवठा खंडित केला.
माजी सरपंच हेमा मोरे म्हणाल्या की, देहूचा कारभार पाहण्यासाठी स्वतंत्र प्रशासक आवश्यक असून येत्या दोन दिवसांत पाणी पुरवठा सुरू झाला नाही तर नगरपंचायतीवर मोर्चा नेण्यात येईल अशा इशारा दिला आहे.