पिंपरी-चिंचवडमध्ये मुद्रांक, कोर्ट फी स्टॅम्प नसल्याने कामकाजाचा खोळंबा; शासनाचाही महसूल बुडतोय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 12:05 PM2020-05-23T12:05:42+5:302020-05-23T12:09:59+5:30
पिंपरीतील मोरवाडी येथील न्यायालयाशी संबंधित नोटरी व्यावसायिक, वकील व पक्षकारांसह नागरिकांची मोठी अडचण
नारायण बडगुजर
पिंपरी : लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यांत पिंपरी-चिंचवड शहर रेडझोनमधून वगळण्यात आले आहे. त्यामुळे बाजारपेठा, उद्योग व न्यायालयीन कामकाज सुरू झाले आहे. मात्र, मुद्रांक व कोर्ट फी स्टॅम्प म्हणून वापरात असलेली तिकिटे उपलब्ध न नसल्यामुळे विविध कामांचा खोळंबा होत आहे. तसेच पिंपरीतील मोरवाडी येथील न्यायालयाशी संबंधित नोटरी व्यावसायिक, वकील व पक्षकारांसह नागरिकांची मोठी अडचण होत असून, मुद्रांक व स्टॅम्प नसल्याने दररोज एक लाखाचे नुकसान होत आहे. यातून शासनाचा मोठा महसूल बुडत आहे.
पिंपरी न्यायालयांतर्गत हजारावर वकील कार्यरत आहेत. तर दोनशे नोटरी व्यावसायिक आहेत. यातील बहुतांश नोटरी व्यावसायिक न्यायालयाबाहेर त्यांचा व्यवसाय करतात. सर्व प्रकारची प्रतिज्ञापत्र, करारनामे, साठेखत, बँकेची गहाणपत्र, घोषणापत्र, विविध परवानगीसाठीचे शपथपत्र आदी कामकाज या नोटरी व्यावसायिकांकडून केले जाते. त्यासाठी ५०० आणि १०० रुपयांचे मुद्रांकाचा आवश्यकतेनुसार वापर केला जातो. त्याचप्रमाणे वकिलांनादेखील न्यायालयीन कामकाजासाठी मुद्रांकांची आवश्यकता असते. न्यायालयात तसेच इतर कायदेशीर बाबींसाठी नागरिकांकडून अर्ज सादर केले जातात. त्या अर्जांवर कोर्ट फी स्टॅम्पची पाच किंवा दहा रुपयांची तिकिटे लावली जातात.
.....................................
वकील, नोटरी व्यावसायिकांचे नुकसान
मुद्रांक व कोर्ट फी स्टॅम्पची तिकिटे उपलब्ध होत नसल्याने वकील व नोटरी व्यावसायिकांची अडचण झाली आहे. कामकाज सुरू झाले; मात्र तरीही काम करता येत नाही. परिणामी उत्पन्न बंदच आहे. लॉकडाऊनमुळे अनेक वकील व नोटरी व्यावसायिकांवर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांची धडपड आहे. जिल्हाधिकारी तथा पुणे जिल्हा मुद्रांक विभागाचे संचालक यांच्याकडे याबाबत निवेदन देण्यात आले आहे. मुद्रांक व कोर्ट फी स्टॅम्पची तिकिटे उपलब्ध करून देण्याची मागणी पिंपरी-चिंचवड नोटरी असोसिएशनकडून या निवेदनातून करण्यात आली आहे.
.................................
फिजिकल डिस्टन्सिंग पाळून सकाळी ११ ते दुपारी दोनदरम्यान न्यायालयाचे कामकाज होत आहे. या वेळी विविध सुनावण्या तसेच प्रकरणांचे कामकाज केले जात आहे. मात्र, मुद्रांक व कोर्ट फी स्टॅम्पची तिकिटे उपलब्ध नसल्याने कामकाजात अडचण येत आहे. तसेच शासनाचा महसूल बुडून वकील व नोटरी व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत आहे.
- पांडुरंग नांगरे, अध्यक्ष,पिंपरी-चिंचवड नोटरी असोसिएशन