शेतकऱ्यांची शेणखताला मागणी वाढली
By admin | Published: May 30, 2017 02:37 AM2017-05-30T02:37:00+5:302017-05-30T02:37:00+5:30
कधीकाळी शेतकरी शेणखताच्या वापरातूनच भरघोस शेती उत्पादन घेत असे. मात्र, साधारणपणे १९७0 च्या दशकात शेतकरी
लोकमत न्यूज नेटवर्क
मोशी : कधीकाळी शेतकरी शेणखताच्या वापरातूनच भरघोस शेती उत्पादन घेत असे. मात्र, साधारणपणे १९७0 च्या दशकात शेतकरी रासायनिक खते वापरू लागले. बागायती शेतीत तर त्याचा वारेमाप वापर होऊ लागला. गेल्या काही वर्षांत युरियाचा वापर अधिक होत होता. गेल्या दोन वर्षांत सर्वच रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने त्यांचा वापर सामान्य शेतकऱ्यांना परवडेनासा झाला आहे. त्यामुळे ते पुन्हा शेणखताच्या वापराकडे वळत असल्याचे पहावयास मिळत आहे.
शहरात मोशी, चऱ्होली, डुडुळगाव, रावेत, चिखली, ताथवडे आदी गावांमध्ये अजूनही हिरव्यागार शेती होते. चऱ्होली, मोशी, आळंदी तसेच वडमुखवाडी परिसरात काही शेतकऱ्यांनी तर शेतातच गांडूळ खताचे डेपो तयार केले आहेत. तेथे शेणखताचा वापरही वाढू लागला आहे. कृत्रिम खताच्या किमती वाढल्याने शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खताच्या वापरास शेतकरी प्राधान्य देत आहेत.
ट्रॅक्टरभर शेणखत खरेदी करून त्याची खेड, चाकण, शिक्रापूर, मंचर आदी भागांत विक्री करण्याचा व्यवसायही काहींनी थाटला आहे. ट्रकभर शेणखताची सहा ते साडेसात हजारांपर्यंत विक्री होत असून, हे खेत थेट शेतापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था व्यावसायिक करीत आहेत. यातून रोजगार निर्मितीही होत आहे. सध्या सर्वत्र खरीपाच्या पेरण्यांना वेग आला आहे.
पुन्हा का वाढली मागणी?
पारंपरिक पद्धतीने तयार होणाऱ्या शेणखत निर्मितीकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस घटणाऱ्या पशुधनामुळे शेणखत दुर्मिळ होत चालले आहे.
४पर्जन्यमानातील अनियमितता, जनावरांच्या चाऱ्याबरोबर उन्हाळ्यातील तीव्र पाणीटंचाई बघता पशुपालकांची मोठी पंचाईत होत असते. त्यामुळे त्यांनाही नाईलाजास्तव पशुधनाची विक्री करावी लागते.
पशुधनाची संख्या घटत आहे. परिणामी शेणखताचाही तुटवडा भासत असून त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहे.